महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महायुतीचा महिलांसाठीचा एक महत्वाकांक्षी निर्णय आहे. राज्यातल्या सगळ्याच महिलांना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने सध्या या योजनेकडे बघितलं जातं.
राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक योजनांची सुरुवात केली आणि या योजना यशस्वीपणे राबवल्या देखील. जुलै 2024मध्ये महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेला एक निर्णय होता. जो यशस्वीपणे राबवला गेल्याने तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचला.
आत्तापर्यंत या योजनेतून अनेक महिलांना लाभ झाला आहे. जय महिलांनी जुलै महिन्यापासून अर्ज दाखल केले आहेत, त्या महिलांना आजतागायत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांसाठी 7 हजार 500 रुपयांची एकूण आर्थिक मदत झाली आहे.
ही योजना सुरू केल्यानंतर याबद्दल अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले गेले. योजना कशी चालवणार? त्यासाठी सरकारी तिजोरी एवढा पैसा आहे का? याचबरोबर ही योजना लवकरच पैशांच्या अभावाने बंद करावी लागेल, असं म्हणत मध्य प्रदेशच्या योजनेचा दाखला महाविकास आघाडीकडून देण्यात आला. मात्र, या योजनेसाठी महायुती सरकारने 46 हजार कोटींची आर्थिक तरतूद करून ठेवली असून त्यामुळे पुढचे किमान पाच वर्ष ही योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, अशी माहिती वेळोवेळी महायुतीच्या काही जबाबदार नेत्यांकडून देण्यात आली आहे.
ही योजना सुरू करण्यामागे मुख्य अजेंडा हा राज्यातल्या सगळ्या महिलांना आर्थिक सक्षम करणं हा आहे, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून सतत करण्यात येतो. तर विरोधकांकडून मात्र या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना नेहेमी टोले लगावले जात असतात. पण महायुतीकडून करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे योजना सुरू करण्यामागे असलेलं मुख्य उद्देश्य पूर्ण होत आहे का? याचा शोध आम्ही घेतला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातल्या अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या योजनेतून काही महिलांनी आज स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. 1500 रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरू करणं अशक्य वाटत असलं, तरी आजही ज्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे अशा अनेकांसाठी ही रक्कम फार मोठी आहे. अशाच अनेक गरीब गरजू कुटुंबातील महिलांनी आज या योजनेच्या पैशातून व्यवसाय सुरू केले आहे. याच व्यवसायाच्या पैशातून आज त्या आपलं घर चालवत आहे.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अशा व्यवसाय सुरू केलेल्या काही महिलांनी स्वत:च्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे. एका लाभार्थी महिलेने सांगितलं की, तिला मिळालेल्या एकूण 7500 रुपयातून तिने स्वत:चा घरगुती कापड व्यवसाय सुरू केला. यातून तिला चांगला नफा सुद्धा झाला असल्याचं तीने सांगितलं. आत्तापर्यंत या व्यवसायातून साधारण 15 हजरांपर्यंतचा नफा या महिलेने कमावला आहे. त्यामुळे आता घरच्या आर्थिक गरजा भागवायला कोणापुढे हात पसरावा लागत नाही, असंही यावेळी बोलताना या महिलेने सांगितलं.
दुसऱ्या एका लाडक्या बहिणीने याच योजनेच्या पैशातून गणपतीच्या वेळी आरतीसाठी वापरली जाणारी घुंगरू कडी विकून दहा दिवसांत 10 हजार रुपये कमावले असल्याचं सांगितलं. तर अजून एका लाभार्थी महिलेने तिच्या कपडे इस्त्री करण्याच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी या पैशातून नवीन इस्त्री खरेदी केल्याचं सांगितलं.
एकंदरीतच या योजनेमुळे महिलांना काही अंशी का असेना स्वत:च्या व्यवसायासाठी फायदा होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात या योजनेच्या अनुदानात वाढ झालीच तर त्यातून देखील अशा महिलांच्या आयुष्याला हातभार लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.