कोल्हापुरात मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले
आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत विश्वासघात केल्याचे आरोप
पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट
रणजित माजगावकर,कोल्हापूर
Kolhapur Shcool Principal Physically Assault On Ex Student कोल्हापूरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीपर्यंत शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थिनीवरच त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत हा प्रकार घडवण्यात आला असून, या प्रकरणी पोक्सो कायद्यासह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.कृष्णा ज्ञानू दाभोळे, असं या आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून ती दहावी पर्यंत याच शाळेत शिकली होती. पीडितेची आई सध्या कोल्हापूर शहरात वास्तव्यास असून काही दिवसांपासून आजारी आहे. आईच्या उपचारासाठी मुलगी कोल्हापुरात परतली होती. हीच संधी साधत आरोपीने तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने पुन्हा संपर्क वाढवला. ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीच्या मुलाचा शहरात फ्लॅट असल्याने दोन महिन्यांनंतर त्या ठिकाणी बोलावून पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी पीडितेने सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईलाही धक्का बसला. त्यानंतर दोघींनी पोलिस मुख्यालयातील महिला कक्षामध्ये तक्रार दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम म्हणजेच पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला मुरगूड येथून अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. पीडितेच्या वडिलांचे निधन झाले असून आई आणि एक बहीण अशा तिघीच कुटुंबात आहेत.आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत,शिक्षक म्हणून असलेली जबाबदारी विसरून आरोपीने आपल्या माजी विद्यार्थिनीला वासनांधतेची शिकार बनवल्याने संपूर्ण परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.