औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे कन्नड-चाळीसगाव घाटातील दरडी पडल्यानं अजूनही वाहतूक बंद आहे. अत्यंत धोकादायक वळणे असलेल्या आणि अरुंद घाटातून गेली कित्येक वर्षे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. आता धुळे-सोलापूर या चार पदरी रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आले तरी या घाटातील बोगद्याचा प्रश्न काही सुटला नाही.
डोंगरदऱ्यात कपारीसारखा दिसणारा हा धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड-चाळीसगाव घाट आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे या घाटातील सहा दरडी काही क्षणात कोसळल्या. आणि तब्बल ४८ तास वाहनं अडकून पडली. भलेमोठ्या डोंगरातल्या दरडी, खडक माती, झाडे वाहून रस्त्यावर आली. काही ठिकाणी अर्धा रस्ताच खचून वाहून गेला. आणि हा घाट किती धोकादायक आहे. हे महाराष्ट्राच्या समोर पुन्हा आले. मात्र, या घाटाचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. कारण या घाटाऐवजी बोगदा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे मार्गाचे काम जवळपास पुर्णतःकडे आले आहे. मात्र, कन्नड- चाळीसगाव मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम १० वर्षापासून रखडलेले आहे. २ हजार कोटींवरून ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला. मात्र, कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. बोगद्याचे काम जेव्हा सुरू होईल, तेथून पुढे सहा वर्षे कामाला लागणार आहेत.
औरंगाबादहून चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ११ किलोमीटरचा घाट वाहतुकीसाठी अलीकडे अत्यंत धोकादायक झाला आहे. घाटाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे उत्तर भारतातून धुळे मार्गे दक्षिणेकडील राज्यात येणारी वाहने आता वाढली आहेत. २४ तास या घाटात वाहनांची गर्दी असते. कित्येकदा ट्रॅफिक जॅम होते. २०१७ या वर्षात अतिवृष्टीमुळे घाटात साडेतीन मीटरपर्यतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाण दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.
२०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे ऑट्रम घाटासह हस्तांतरित झाला. दहा वर्षात या घाटावे स्ट्रक्चर ऑडिट किंवा सुरक्षा पाहणी झालेली नाही. त्यामुळे घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षापासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.
सध्या औट्रम डीपीआरचे काम सुरू असल्याची माहिती आहे. ५५०० कोटींचा अंदार्जित खर्च आहे. मशीनच्या साहाय्याने १४ हजार मीटर डोंगर फोडावा लागणार आहे. काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंदाकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हॅटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा प्रस्तावात समावेश आहे. मात्र, हे काम कधी सुरू होईल, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. आजघडीला पाच दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत ठेवायची असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.