पुणे: वर्गात नेहमी पहिला येणारा विद्यार्थी दहावीला दुसरा क्रमांक मिळवतो, गुणांबाबत शाळेकडे पाठपुरावा केल्यावर समजते की शाळेच्या चुकीमुळे बोर्डाकडे चुकीचे गुण पाठवले गेले आणि विद्यार्थ्याला फटका बसलाय, ही हकीकत आहे पुण्यातील नुमवी शाळेतील सक्षम तेलतुंबडे या विद्यार्थ्याची.
पुण्यातील नुमवी मुलांच्या शाळेतुन इयत्ता 10 वीतून उत्तीर्ण झालेला सक्षम तेलतुंबडे. गेल्या काही दिवसांपासून हा विद्यार्थी 11 वी प्रवेशात आय टी विषय मिळवण्यासाठी धडपडत आहे. खरंतर सक्षम हा विद्यार्थी हुशार आहे, त्याला हव्या त्या महाविद्यालयात त्याला हवा असलेला विषय सहज मिळाला असता पण शाळेच्या चुकीमुळे त्याला आता वणवण फिरावं लागतंय. नेहमी वर्गात पहिला येणारा सक्षम दहावीला अचानक वर्गात दुसरा आला, तसेच गुणांबाबत शंका आल्याने त्याने शाळेकडे विचारणा केली, त्यावेळी शाळेकडून चुकीचे गुण बोर्डाकडे पाठवल्याचे उघडकीस आले आहे.
शाळेने चूक झाल्याचा खुलासा केला. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापणाद्वारे गुण देण्यात आले. त्यात सक्षम सह काही विद्यार्थ्यांना मराठी विषयाचेच गुण संस्कृत विषयाला देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात घोळ झाल्याचे शाळेने ही मान्य केले आहे. याबाबत बोर्डाकडे सुधारित गुण पुन्हा पाठवले आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही बोर्डच करणार असल्याचे सांगत शाळेने हात वर केले आहे.
निकाल जाहीर झाल्यापासून सक्षम आणि त्याच्या पालकांनी शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयात चकरा मारल्या आहेत. शाळेने चूक मान्य करूनही बोर्डाकडून त्याच्या गुणांबाबत अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. कमी गुणांमुळे सक्षमला हवा तो विषय घेता येत नाहीये, शिक्षण विभागाची अनास्था यानिमित्ताने समोर आलीय, शाळेच्या चुकीमुळे वर्गात पहिला येण्याचा मान मात्र हिरावला गेला हे खरं.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.