अभिजित देशमुख, कल्याण
कल्याणमध्ये सायबर क्राईमची एक मोठी घटना घडलीये. वीज बिल थकल्याचं सांगत मॅसेजद्वारे एका वृद्ध आजोबांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. वयोवृद्ध आजोबांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावलाय.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे ६७ वर्षीय जयराम जाधव हे त्यांची मुलगी आणि नातीसोबत राहतात. जयराम जाधव हे निवृत्त झालेले आहेत. त्यांना रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या घराचे लाईट बील भरले गेले नाही. त्वरीत पैसे भरा. नाहीतर तुमचा वीज पुरवठा आत्ताच खंडीत केला जाईल.
घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले. लाईट नसेल तर अंधारात रात्र कशी काढणार. या भीतीने जाधवांनी त्या व्यक्तिला मी बील भरण्यास तयार आहे. बील कसे भरायचे ते सांगा, असे सांगितले.
समोरच्या व्यक्तीने प्रथम १०० रुपये पाठविण्यास सांगितले. या दोघांचे संभाषण सुरु असतानाच जयराम जाधव यांच्या खात्यातून १ लाख ४४ हजार रुपये गायब झाले. थोड्यावेळात जयराम यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी जयराम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम यांचे खाते गोठवले. खाते गोठवले गेल्याने समोरचा व्यक्ती पैसे काढून शकला नाही. पुढील प्रक्रिया करुन जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे पेसै परत केले. जयराम यांच्या बँक खात्यात त्यांच्या निवृतीचा पैसा होता.
आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गेल्याने जयराम जाधव त्रस्त होते मात्र कोळशेवाडी पोलीसांनी सतर्कता दाखवून अवघ्या काही तासात पैसे पुन्हा मिळवून दिल्याने जाधव यांनी कोळशेवाडी पोलिसांचे आभार मानलेत.
याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी नागरिकांना फोनवर बोलताना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे टाळा असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.