जळगाव महापालिकेच्या आज रविवारी झालेल्या विशेष महासभेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकाने आपण सत्ताधारी पक्षाचा सदस्य नसून गरीब नगरसेवक आहोत, असं म्हणत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ निर्माण झाला. ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी 'गरीब की बीबी सबकी भाभी' असे वक्तव्य केल्याने सभागृहात वाद निर्माण झाला होता. या वक्तव्याची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी त्यांची कानउघाडणी करत त्यांना सभागृहाबाहेर काढलं.
महासभेत शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू असताना मूळ व वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याचा विषय चर्चेला आला. पटेल आपली बाजू मांडत होते. "प्रभागातील नागरिक कामांसाठी माझ्याकडे येतात, पण मी सत्ताधारी पक्षाचा नसून एक गरीब नगरसेवक असल्याने आमच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही," असे सांगताना त्यांनी 'गरीब की बीवी सबकी भाभी होती है' असे वादग्रस्त विधान केले.
या विधानावरून भाजप नगरसेवक विजय बांदल आणि शरद तायडे यांच्यासह पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने ठाकरे गटाच्या नगरसेवकांना डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर झालेल्या वादावादीमुळे आणि घोषणाबाजीमुळे महापालिकेच्या महासभेत काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या या घटनेची महापौर दीपमाला काळे यांनी गंभीर दखल घेतली. महापौर काळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे इ.बा. पटेल आणि अंगावर धावून जाणारे विजय बांदल या दोन्ही नगरसेवकांना दहा मिनिटांसाठी सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. दोन्ही नगरसेवक बाहेर गेल्यानंतर महासभेचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले. महासभेत झालेला हा वाद केवळ सभागृहापुरता मर्यादित न राहाता सभागृहातून बाहेर पडल्यानंतरही त्याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या कार्यालयातही भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.