जळगाव : जळगाव महापालिकेत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने प्रथमच सत्ता स्थापन केली होती. मात्र पाच वर्षांच्या काळात मोठ्या घडामोडी घडल्या आणि गट पडल्याने भाजपच्या हातातून सत्ता गेली होती. यंदा होत असलेल्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र निवडणूक लढण्याचे सांगण्यात येत असून या निवडणुकीत देखील भाजप बाजी मारणार असे चित्र सध्या स्थितीला आहे.
जळगाव महापालिकेत सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणूकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी भाजपने ७५ जागा लढून तब्बल ५७ जागा जिंकल्या हाेत्या. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, एमआयएम पक्ष वेगवेगळे लढले हाेते. त्यावेळी भाजपला ५७, शिवसेनेला १५ तर एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर जळगाव महापालिकेत देखील मोठा फेरबदल झाला होता.
महायुतीत होणार बिघाडी
राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढू शकतील; अशी स्थिती जळगाव दिसून येत आहे. परंतु जळगाव मध्ये महायुती हाेण्याची शक्यता कमी दिसत आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळी ५७ जागा मिळाल्याने त्यांनी यावेळी जाेरदार तयारी केली आहे. ते महायुतीतील मित्र पक्षाना जास्त जागा देण्यास तयार नाही. तर महायुतीतील शिंदे गटाकडे माजी नगरसेवक २० पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे ते कमी जागा घेण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाकडे एकही नगरसेवक नसला तरी त्यांच्याकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपात एकमत हाेण्याची शक्यता कमीच आहे.
महाविकास आघाडीला लावावी लागणार ताकद
तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढली तरी त्यांना जास्त काही फायदा हाेवू शकेल; असे चित्र दिसून येत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट जळगाव महापालिकेत प्रबळ पक्ष आहे. त्यांच्याकडे आजच्या स्थितीत १२ नगरसेवक आहेत. परंतु या पक्षातील काही जण भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) व काॅंग्रेसची काेणतीही ताकद शहरात नाही. त्यामुळे एकत्र लढूनही महाविकास आघाडीला फायदा होईल असे चित्र सध्यातरी दिसत नाही.
राष्ट्रवादीला होऊ शकतो फायदा
दुसरीकडे महायुतीत जागा वाटपाची रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागाबाबत जाेरदार रस्सीखेच हाेईल. एखादेवेळी राष्ट्रवादी अजित पवार गट समझोता करून भाजपसाेबत राहील. परंतु शिंदे गट राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजप अशी लढतही होण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीत भाजपचे संघटन थेट बुथस्तरावर बळकट असल्याने त्याचा फायदा हाेऊ शकताे. त्यामुळे भाजप अधिक जागा जिंकून एकहाती सत्ता घेवू शकताे. जर त्यांच्या साेबत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष राहिल्यास त्यांना काही जागा मिळविता येतील. यामुळे महापालिकेत त्यांचे अस्तित्व दिसू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.