भारतीय रेल्वे लवकरच डोअर-टू-डोअर पार्सल डिलिव्हरी सेवा सुरू करणार
ग्राहकांच्या घरातून पार्सल उचलून संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार
प्रमुख आठ शहरांत सुरुवातीला सेवा सुरू होणार
ट्रेन सुटण्याच्या १५ दिवस आधीपासून एक दिवस आधीपर्यंत बुकिंग करता येणार
रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि रेल्वेच्या माध्यमातून पार्सल पाठवणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे लवकरच ग्राहकांसाठी खास डोअर-टू-डोअर पार्सल सेवा सुरू करणार आहे. या सुविधेमुळे आता पार्सल पाठवण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाण्याची गरज नाही. रेल्वेकडून पार्सल थेट घरातून उचलले जाणार असून, ते संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे.
सध्या रेल्वेमार्फत पार्सल पाठवायचे असल्यास ग्राहकांना रेल्वे स्थानकातील पार्सल कार्यालयात जावे लागते. तसेच पार्सल मिळवण्यासाठीही अनेकदा स्थानकावर जावे लागते. मात्र, नव्या सुविधेमुळे ग्राहकांची ही धावपळ कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या सेवेमुळे पार्सल पाठवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय रेल्वे ही सुविधा सुरुवातीला देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये सुरू करणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याची योजना आहे.
यासाठी मोबाईल अॅप आणि वेबसाइट तयार केली जाणार आहे. CRIS संस्थेकडून या सिस्टीमची चाचणी पूर्ण झाल्यानंतर सेवा सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे. या सुविधे अंतर्गत पार्सल ग्राहकांच्या घरापासून ते संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे. या सेवेसाठी नियोजित ट्रेन सुटण्याच्या १५ दिवस आधीपासून ते एक दिवस आधीपर्यंत बुकिंग करता येणार आहे.
पार्सल ट्रेन सुटण्याच्या किमान एक तास आधी आणि जास्तीत जास्त ९२ तास आधी रेल्वेच्या पार्सल कार्यालयात जमा करावे लागेल. तसेच पार्सल योग्य पद्धतीने पॅक करण्याची जबाबदारी ग्राहकाची असेल. ज्वलनशील किंवा रेल्वेने प्रतिबंधित केलेल्या वस्तू पार्सलमधून पाठवता येणार नाहीत. एकंदरीत, भारतीय रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे पार्सल पाठवणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि मेहनत वाचणार आहे. आता रेल्वे स्थानकावर जाण्याची कटकट कमी होऊन घरबसल्या पार्सल पाठवणे अधिक सोपे होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.