भरत नागरे, साम प्रतिनिधी
मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर केला जातो. मात्र हा मांजा अनेकांच्या जिवावर उठलाय. या मांजाच्या विक्री करण्यावर बंदी घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली. विक्री करणांऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र संक्रांतीला मांजाचा सर्रास वापर दिसून आला. राज्यातील अनेक शहरात मांजामुळे इजा होण्याच्या घटना घडल्यात. हिंगोलीमध्येही थरकाप उडवणारी घटना घडलीय.
हिंगोलीत मांजाने एका मजुराचा गळा कापला गेलाय. शेख शेरू असे या मजुराचे नाव आहे. जखमी झाल्यानंतर मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या गळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या गळावर तब्बल २२ टाके पडलेत.
दैनंदिन कामकाज आटोपून दुचाकीवरून गावाकडे जात असताना शेख शेरू यांच्या गळ्याला इजा झाली. जखमी झाल्यानंतर शेख शेरू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजामुळे गळा चिरला गेल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या गळ्यावर २२ टाके पडले आहेत. यापूर्वी देखील पोलीस कर्मचारी शाळकरी विद्यार्थ्यांनी मांजामुळे जखमी झाले होते.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने देशभरात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. या पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरतोय. या मांजामुळे अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय, त्यामुळे सरकारने नायलॉन मांजावर बंदी घातलीय, तरी अनेक ठिकाणी मांजामुळे अनेकाना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मांजावर बंदी घातल्यानंतरही दुकानदारांकडून नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जातोय.
त्या पार्श्वभुमीवर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि वापरणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. भारतीय न्याय संहितेच्या ११० कलमांतर्गत थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. मात्र तरीही मांजाचा वापर दिसून आला.
राज्यातील विविध भागात लहान मुलांसह ज्येष्ठांना मांजामुळे इजा झालीय. नाशिकमध्ये एका तरुणाचा नायलॉन मांजाने बळी घेतला. नाशिकमधील घटना ताजी असताना नंदूरबारमध्येही दुर्दैवी घटना घडली. पंतग उत्सवादरम्यान ७ वर्षीय बालकाचा दोऱ्याने गळा कापून मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. कार्तिक एकनाथ गोरवे असे मृत मुलाचे नाव आहे. दोरमुळे गळ्याला जखम झाल्यानंतर कार्तिकला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.