बहावा वृक्ष बहरला की पावसाचं आगमन झालंची चाहूल लागते, तशी गोव्यातल्या उत्सवांचीही चाहूल लागते. गोव्यातल्या पावसाची एक वेगळीच मजा असते. फेसाळणारा समुद्र, हिरव्यागार शालूने नटलेला निसर्ग, यामध्ये भर पडते ती इथल्या सांस्कृतिक पावसाळी सणांची. विविध संस्कृतींचं दर्शन घडविणारे गोव्यातील सण हे इथल्या मान्सूनचं खरं आकर्षण ठरत असतात. इथल्या पर्यटनात आणि गोव्याच्या संस्कृतीत त्यांचं एक वेगळ महत्त्व आहे आणि पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच सणांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
गोव्यातील सर्वात लोकप्रिय मान्सून उत्सवांपैकी साओ जोआओ हा एक महोत्सव असून हा उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या नावावरून साजरा केला जाणारा हा सण विहिरी, नद्या आणि तलावांमध्ये उडी मारून जलक्रीडा करत साजरा केला जातो. दरवर्षी 24 जून रोजी हा सण साजरा केला जातो. पाण्यात तरंगणारे रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपारिक संगीत, स्थानिक लोक आणि पर्यटक एकसारखे दिसणारे कोपल्स (फुलांची माळा) घालतात, यामुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडते.
सांगोड उत्सवाने मान्सून उत्सवाची सुरुवात होते. गोव्यातील मासेमारी करणाऱ्या समुदायाद्वारे साजरा केला जाणारा हा पारंपारिक बोट उत्सव आहे. दरवर्षी, 29 जून रोजी, गोव्यात सेंट पीटर आणि सेंट पॉल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. सेंट पीटरचं या समुदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणापासूनच 'रॅम्पन' मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते, मच्छीमार बांधवांकडून आपल्या लाडक्या दर्या राजाचे आशीर्वाद घेतले जातात, विधीवत पूजा करून पुढील वाटचालीसाठी बोटी तयार केल्या जातात.
छोट्या नाव एकत्र आणून त्या एकमेकांसोबत जोडल्या जातात. नारळाच्या झावळ्या, फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांनी या छोट्या नावांना सजवलं जातं. चर्चची प्रतिकृती या नावेच्या मध्यभागी उभारली जाते. यावेळी हा मच्छीमार बांधव आपलं पारंपरिक लोकनृत्य आणि संगीता सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.
"द मड फेस्टिव्हल" म्हणून ओळखला जाणारा धार्मिक सण जूनमध्ये साजरा केला जाणारा पारंपारिक उत्सव आहे. पोंडा येथील मार्सेल गावातून या उत्सवाला पहिल्यांदा सुरुवात झाली होती. हा अनोखा उत्सव देवकी कृष्ण मंदिराला केंद्रस्थानी ठेवून साजरा केला जात असून भगवान कृष्ण आणि त्याची आई देवकी यांना समर्पित आहे.
सणाची कधी सुरुवात झाली याविषयी माहिती अस्पष्ट असली तरी, गावकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने त्याचं स्मरण करतात. या उत्सवात सहभागी आनंदाने चिखलात रंगतात आणि खेळांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जातात. देवकी कृष्ण मंदिराशेजारी असलेले मैदान गोवेकरांच्या उपस्थितीने बहरून जातं.
या विस्तृत मेजवानीच्या केंद्रस्थानी एक लक्ष्यवेधक प्रथा आहे, जिथे भक्त सेंट ॲन यांना आदर म्हणून काकडी अर्पण करतात. या हंगामात भरपूर प्रमाणात काकडीचं उत्पादन होतं. त्यामुळे या हंगामात हा सण साजरा केला जातो असं म्हटलं जातं. गोव्यात हंगामातील पहिली कापणी ही काकडीची केली जाते.
ख्रिस्ती धर्मगुरूंनी दिलेल्या निर्देशानुसार, लोक दोन काकड्या आणतात. या काकड्या मदर मेरीच्या पुतळ्याजवळ ठेवतात. उत्सवादरम्यान भेट दिलेल्या या काकड्या नंतर स्थानिक समुदाय, पुजारी आणि जवळपासच्या गावांमध्ये वाटल्या जातात. काहीजण ताज्या काकड्यांचा आस्वाद घेण्यास प्राधान्य देतात, तर काहीजण सॅलडमध्ये समाविष्ट करतात.
मान्सूनच्या पावसाने निसर्ग चिंब होत असताना, दिवारचे नयनरम्य बेट बोंडेरम महोत्सवाने न्हाऊन निघतं. ऑगस्टच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे रंगीत परेड. या परेडमध्ये गावातील प्रतिस्पर्धी पाड्यांमध्ये हास्य विनोद केला जातो.
प्रत्येक गट रंगीबेरंगी झेंड्यांनी सजलेल्या चित्ररथांचं प्रदर्शन करतो. सुंदर चित्ररथांची स्पर्धा भरवली जाते. या उत्सवाला पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.
अशाप्रकारे गोव्याचा मान्सून म्हणजे निव्वळ बरसणाऱ्या पावसाच्या सरीं पुरताच मर्यादित नाही. गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारे हे उत्सव खऱ्या अर्थाने येथील मान्सूनचं आकर्षण आहे. त्यामुळे जसं हिवाळ्यात तुमच्या बॅग पॅक करून मनमुराद आनंद लुटण्यासाठी गोवा गाठता. तसंच या पावसाचा आणि गोव्याच्या पावसाळी सणांचा आनंद लुटण्यासाठी तुमचा आवडत्या सणाचा पोशाख घाला आणि गोव्यातील या उत्सवांच्या जादूमध्ये मग्न व्हा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.