शरद पवारांचे खंदे समर्थक भारतभाऊ बोंद्रे यांचे निधन
चिखली येथे वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बोंद्रे यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा
संजय जाधव, साम प्रतिनिधी
शरद पवार यांचे खंदे समर्थक व राज्याचे "जलपुरुष" म्हणून ओळख असलेले भारतभाऊ बोंद्रे यांचे निधन झाले. चिखली येथे वयाच्या ८४ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारासाठी डॉ.तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भाऊ बोंद्रे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
भारतभाऊ बोंद्रे हे १९६७ पासून शरद पवार यांच्यासोबत होते. ते शरद पवार यांचे एकनिष्ठ साथीदार होते. १९७२ साली प्रथम चिखली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. १९८० ते १९९५ अशी सलग १५ वर्षे भारतभाऊ बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. फेब्रुवारी १९८० मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विजय मिळवला होता.
राज्याच्या मंत्रिमंडळातही भारत भाऊ बोंद्रे यांनी पाटबंधारे मंत्री, उद्योगमंत्री व शिक्षण मंत्री पदे भूषवली आहेत. पाटबंधारे मंत्री असताना बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प व जिगाव प्रकल्पाचे ते प्रणेते होते. यासह त्यांनी राज्यातील शेकडो प्रकल्पांना त्यावेळी गती दिली होती. त्यामुळे त्यांना राज्यात "जलपुरुष" म्हणूनही ओळखलं जात होतं.
याशिवाय जिगाव प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प, नळगंगा प्रकल्प यासह जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे जल प्रकल्पांची धरणे भारत भाऊंच्या कार्यकाळात झाली आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल, असे भारत भाऊ नेहमी म्हणायचे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.