५ तेल रिपॅकिंग उद्योगांवर FDAची धडक कारवाई
१ लाख १९ हजार १८७ किलो खाद्यतेल जप्त; किंमत सुमारे ₹१.९४ कोटी.
जुन्या टिनचा पुनर्वापर, अस्वच्छता आणि तेल वेगवेगळ्या नावांनी विक्री केल्याचे तपासणीत आढळले
पाचही आस्थापनांचे परवाने निलंबित
छत्रपती संभाजीनगर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) विभागीय पथकाने बीड जिल्ह्यात खाद्यतेलातील भेसळ आणि अनियमिततेविरोधात मोठी कारवाई केली आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी MIDC बीड, माजलगाव आणि वडवणी परिसरातील ५ तेल रिपॅकिंग उद्योगांवर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत तब्बल १ लाख १९ हजार १८७ किलो संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपये आहे.
तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. जुन्या आणि अस्वच्छ टिनचा पुन्हा वापर, एकाच टाकीतील तेल वेगवेगळ्या नावांनी विक्री करणे, तसेच रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशा नावाने तेलाची विक्री करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याशिवाय तेल साठवणुकीच्या टाक्यांची दुरवस्था, परिसरातील अस्वच्छता, आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव, नियमित लॅब टेस्ट न करणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव यांसारख्या त्रुटीही आढळल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या तेलाचे २७ नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
५ ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करून त्यांचे कामकाज बंद करण्यात आले आहे. सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधित आस्थापनांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.