बालाजी सुरवसे, साम टीव्ही
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाहीत. यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण नैराश्यात गेले असून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. धाराशिवमध्ये शनिवारी (ता २२) अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
शिवाजी उर्फ अमोल विठ्ठल निलंगे, असं मृत शेतकऱ्याचे नाव असून ते पाटोदा गावातील रहिवासी आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहत आपली व्यवस्था मांडली आहे. शिवाजी यांनी चिठ्ठीत लिहलंय की, "माझ्यावर ट्रॅक्टर आणि शेतीचे कर्ज जास्त झाले आहे. यावर्षी नापिकी असल्यामुळे हे कर्ज फेडणे शक्य नाही. तसेच माझ्या मुलाचा नंबर देखील सैनिक स्कुल यादीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर लागला आहे".
"आम्हाला (मराठा समाजाला) आरक्षण असते तर तो नक्कीच मेरिटमध्ये आला असता, कारण पहिल्या यादीत इतर आरक्षण लाभार्थ्यांचा नंबर लागला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याने हे सर्व घडलंय.त्यामुळे मला नैराश्य आलं असून सर्व गोष्टीचा विचार करुन आत्महत्या करीत आहे".
दरम्यान, शिवाजी यांनी आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पंचनामा केल्यानंतर शिवाजी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारने मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.