सततचा दुष्काळ, शेतीमालाला कमी मिळणारा भाव आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी पुढील पाच वर्षांत तब्बल एक लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची माहिती दिली.
'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना' असे या योजनेचे नाव आहे. २०२७ ते २०३१ या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत रिक्षा खरेदीसाठी लाभार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. रिक्षाच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. तर उर्वरित ९० टक्के रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबांनाही रिक्षा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
योजनेच्या पहिल्या वर्षात २० हजार पात्र शेतकरी कुटुंबांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. पात्र अर्जदारांची संख्या कमी असल्यास उर्वरित रिक्षा त्याच जिल्ह्यातील इतर तालुक्यांना दिल्या जातील. या योजनेसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्जांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरीद्वारे केली जाईल. त्यानंतर बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम दिली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत उत्पन्नाचा दुसरा मार्ग मिळू शकतो. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होणार असून, ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.