बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे
ओडिशातील गोपाळपूरजवळ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ वेगाने किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ आज दुपारपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. हे वादळ उत्तर दिशेने पुढे जात असून नरसापूर ते ओडिशातील पुरी या किनारपट्टीच्या दरम्यान गोपाळपूरजवळ धडकण्याचा अंदाज आहे. किनाऱ्यावर पोहोचताना वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर असू शकतो.
या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये दिसून येऊ शकतो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, रायलसीमा आणि मध्य प्रदेशात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हवामानात आजही बदल कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील. दुसरीकडे, राज्यातील काही शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. धुळे येथे १०.४ अंश, यवतमाळ ११.४ अंश, गोंदिया १२.२ अंश, जेऊर १२.५ अंश, जळगाव १२.६ अंश आणि वर्धा येथे १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.