संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का देत, त्यांच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' केले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष, अनुसूचित सेलचे सचिव, तसेच शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांचा समावेश आहे.भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या सरचिटणीसांनी प्रवेशावेळी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, "सत्ताधारी पक्षात फक्त 'मन की बात' ऐकली जाते, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर म्हणजेच जन की बात वर कोणाचेही लक्ष नाही.
३५-४० वर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाहीला महत्त्व दिले जात आहे.तसेच शिवसेना शिंदे गटात ३८ वर्षे काम केलेल्या एका विभागप्रमुखांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले, मात्र नव्या समीकरणात जुन्या निष्ठावंतांची दखल घेतली जात नाही, म्हणूनच आम्ही काँग्रेसचा हात धरला आहे.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.
ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या भूलथापांना कंटाळून निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. अनेक माजी नगरसेवक देखील आमच्या संपर्कात आहेत. ज्याप्रमाणे टीमचा कॅप्टन चांगला असेल तर वर्ल्ड कप जिंकता येतो, त्याचप्रमाणे आम्ही ही महानगरपालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलो आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ठरेल यात शंका नाही.रस्त्यांच्या समस्या, वाढते नागरी प्रश्न आणि सत्तेचा गैरवापर याला शह देण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीत काँग्रेस आपली अंतर्गत ताकद वाढली असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनीव्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.