CM Eknath Shinde On Shivsena Advertisements Dispute : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची जाहिरात सर्व वृत्तपत्रात छापून आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे.
तसेच 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असा देखील उल्लेख आहे. या जाहिरातीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यानतंर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवारांनी लगावला टोला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहिरातीतील सर्व्हे कुणी केला असा सवाल उपस्थित केला होता, तसेच शिंदेंची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा जास्त असल्याचे जाहिरातीत दाखवल्याचे भाजपला मान्य आहे का असा टोला देखील लगावला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हा सर्वे कोणी केला आणि जाहिरात को दिली हे माहिती नसल्याचं आश्चर्यकारक स्पष्टीकरण दिलं, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील ही जाहिरात शासनाने दिली नसल्याचे म्हटले आहे.
"ती जाहिरात शासनाने दिलेली नाही"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ती जाहिरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्र्यांचं हे श्रेय आहे. केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या सरकारला आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकलो, असे ते म्हणाले. (Shivsena Advertisements Dispute)
"हा जनतेचा मोठेपणा आहे"
शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय, हे सर्व प्रकल्प करोडो लोकांना दिलासा देणारे आहेत. त्यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना-भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही, मात्र त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आलेल्या आहेत. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. आम्ही आमचे काम करत राहू, आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही. आरोप जेवढे करतील त्यापेक्षा दुपटीने आम्ही काम करू, असे ते म्हणाले. (Latest Political News)
जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे...?
या जाहिरातीमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदींना, महाराष्ट्रात शिंदेंना जनतेचं अफाट प्रेम मिळत आहे' असे म्हटले आहे. तसेच राज्यातील जनतेची मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती असल्याचे देखील म्हटले आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी जनतेचा कोल कोणाला आहे हे दाखवताना एकनाथ शिंदेंना 26.1 टक्के लोकांनी पसंदी दर्शवली तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यापेक्षा कमी 23.2 टक्के लोकांनी पसंदी दर्शवल्याचे सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.