sanjay shirsat vs ambadas danve : राज्यात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र राजकीय वातावरण तापलेय. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यात छुप्या पद्धतीने प्रचार सुरु झाला. पण त्यावर आयोगाची करडी नजर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री पैसे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कोणत्या पक्षासाठी पैसे वाटले जात होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र ठेवून घेत मतदानासाठी १ हजार रुपये देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला जवाहरनगर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगरमध्ये मध्यरात्री पोलिसांनी ही धडक कारवाई केली. कोणत्या पक्षाच्या उमेदवारासाठी पैसे वाटत होता, ही माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. अशोक रामभाऊ वाकोडे (४२, रा. शंभूनगर) असे पैसे देणाऱ्याचे आणि नदीम पठाण (रा. इंदिरानगर) असे पैसे घेणाऱ्याचे नाव आहे.
जवाहरनगरमध्ये मध्यरात्री वातावरण तापले होते. मतदान करू नये यासाठी पैशाचे वाटप केल्यावरून मध्यरात्री गोंधळ झाला होता. पैसे देऊन लोकांच्या बोटाला शाई लावत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला. मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्तांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मध्यरात्री जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये मोठा जमाव जमला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उमेदवार राजू शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसैनिक जमा झाले होते. शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्याकडून पैशाचं वाटप केले जात आहे, असा आरोप करीत राजू शिंदे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राजू शिंदे यांची संजय शिरसाट आणि त्यांच्या कार्यकर्तयांविरोधात जवाहरनगर पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केलाय.
सोमवारी (१८ नोव्हेंबर २०२४) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता प्रत्येक मतदारसंघात छुप्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरमध्येही छुपा प्रचार करण्यात येत आहे. या छुप्या प्रचारात पैशांचा वापर होतोय का? यावर आयोग आणि पोलिसांची करडी नजर असेल. २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदारसंघात मतदान होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.