छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव
NICUमध्ये एसीमध्ये शॉर्टसर्किट
सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी नाही
९ बाळांना दुसऱ्या रुग्णलयात हलवले
अमरावतीत अलीकडेच एका नामांकित रुग्णलयात महिलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या अग्नितांडवात ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे पावणे तीनच्या सुमारास हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) आग लागली. विशेष म्हणजे, त्यावेळी NICUमध्ये तब्बल ९ बाळांवर उपचार सुरू होते. सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे सर्व बाळांसह रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.
प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं.
आग NICUमध्ये लागल्याने सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे नवजात बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं. हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टर आणि बचाव पथकाने तातडीने हालचाली करत सर्व ९ बाळांना NICUमधून सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. यापैकी ५ बाळांना घाटी रुग्णालयात, ३ बाळांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बाळाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
दरम्यान, ज्या पहिल्या मजल्यावर NICU आहे, त्या मजल्यावर एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये NICUमधील ९ बाळांसह जनरल विभागातील ३६ आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश होता. या सर्व रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर हलवण्यात आलं. बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलीस तसेच आरसीपीच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला. वेळीच मिळालेली आगीची माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, डॉक्टर व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली. ९ चिमुकल्यांसह एकूण ५८ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.