शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील चांगल्या शिक्षणासाठी राज्यात पाच विद्यानिकेतन शाळा आहेत. मात्र, त्याच शाळेत शिकवणीसाठी शिक्षक नाहीत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सरकार चालवत असलेल्या विद्यानिकेतन शाळेत १२ पैकी केवळ २ शिक्षक आहेत. आणि तेच शिक्षक सहावी ते दहावीपर्यंतच्या पाच वर्गासाठी शिकवतात. इतर विषयासाठी दुसऱ्या शाळेतले शिक्षक उसनवारीवर शिकवण्यासाठी येतात. विशेष शाळांची ही अवस्था आहे तर मग सांगा सरकारी इतर शाळांची अवस्था काय असेल?
संभाजीनगरच्या शासकीय विद्याकेतनमध्ये गणित-विज्ञान शिक्षकांचा अभाव आहे. सध्या शाळेच्या आस्थापनेवरील दोनच शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा भार पडलेला आहे. गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देणाऱ्या शासकीय विद्यानिकेतनमधील शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान यासारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे पालक, विद्यार्थी चिंतेत आहेत.
विद्यानिकेतनमध्ये केवळ दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. यामध्येही एका शिक्षकाकडे गृहप्रमुखाचा पदभार आहे, तर दुसऱ्या शिक्षकाकडे इतर अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. एकंदरीत संपूर्ण इमारतीत फक्त एक शिक्षक नियमित अध्यापन करत आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेमार्फत चार अतिरिक्त शिक्षक दिले गेले आहेत, पण हे शिक्षक प्राथमिक शाळांचे असल्याने त्यांना दहावीच्या गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे विषय शिकवताना अडचणी येत आहेत.
विद्यानिकेतनमध्ये स्पर्धा परीक्षेतून निवडले जातात. विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन ही शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे निवड झालेल्या ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली निवासी शाळा आहे. शासन या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, आणि शैक्षणिक सुविधा मोफत पुरवते. मात्र, १२ मंजूर पदांपैकी केवळ चार शिक्षक कार्यरत असून त्यापैकी दोन शिक्षक इतर ठिकाणी पदभार सांभाळत आहेत, तर उरलेल्यांपैकी एक गृहप्रमुख आहेत. अशा वेळी फक्त एक शिक्षक संपूर्ण इयत्तांना शिकवू शकतो काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सध्या माजी विद्यार्थ्यांकडून मानधन तत्त्वावर शिकवले जात आहे, पण ही तात्पुरती आणि तोडगी उपाययोजना आहे. शासकीय दर्जाच्या शाळेत अशी परिस्थिती असावी ही शासनाच्या शिक्षण व्यवस्थेची लाज वाटावी अशी बाब आहे.
राज्यात संभाजीनगर, अमरावती, धुळे, सातारा (पुसेगाव), यवतमाळ (केलापूर) केवळ या पाच ठिकाणीच शासकीय विद्यानिकेतन आहेत. या सर्व ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.