रामनाथ ढाकणे, साम टीव्ही
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी (ता. १२) रात्री एक खळबळजनक घटना घडली. पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे मृत मुलाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी साहिलने बेडरुममधील आरशावर "आय वॉन्ट टू रिस्टार्ट" असा मजकूर लिहून ठेवला होता. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.
साहिलने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, पोलीस उपायुक्ताच्या मुलानेच आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हा १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता. शनिवारी रात्री त्याने आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केले.
इतकंच नाही तर साहिलने रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत निवांत गप्पा देखील मारल्या. त्यानंतर तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. सकाळी साहिलचे आई-वडील त्याला उठवण्यासाठी गेले असता, खोलीचा दरवाजा आतमधून बंद होता. आवाज देऊनही मुलगा प्रतिसाद देत नसल्याने आईने खिडकीतून डोकावून बघितले.
तेव्हा साहिल याचा मृतदेह बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. साहिलने आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून याप्रकरणी वेदांनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
दसऱ्यानिमित्त गावाकडे आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसरीकडे खुलताबाद तालुक्यातील शेखपूरवाडी शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. शिवाय कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या एका 42 वर्षीय महिलेचा तलावात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. एकाच दिवशी पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना संभाजी नगर जिल्ह्यात समोर आल्या. मनपा आणि अग्निशामक दलाच्या पथकाने रेस्क्यू करत या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.