Maharashtra FDA saam tv
महाराष्ट्र

Maharashtra FDA: तेलामुळे कॅन्सरचा धोका? FDA ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा इशारा, नियम तोडल्यास 10 लाख दंड

Cooking Oil Safety: महाराष्ट्र FDA कडून खाद्यतेलाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत तपासणी वाढवली जाणार आहे. वारंवार गरम केलेलं तेल, सुटं तेल आणि नियमबाह्य पॅकिंगविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र हेच तेल चुकीच्या पद्धतीने तयार केलं, पॅक केलं, विकलं किंवा वारंवार गरम करून वापरलं तर आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) याबाबत आता मोठी चिंता व्यक्त केलीये.

महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेच्या पुढील टप्प्यात खाद्यतेल हा प्रमुख केंद्रबिंदू असेल, असं स्पष्ट केलंय. खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते पॅकिंग, वितरण, विक्री आणि हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये त्याचा होणारा वापर या सर्व बाबींवर आता लक्ष दिलं जाणार आहे.

विशेषतः एकच तेल वारंवार गरम करून वापरण्याची पद्धत सर्वात धोकादायक असल्याचं मुंढे यांनी म्हटलं आहे. अशा तेलाच्या सेवनामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो, कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो आणि मुलांच्या मेंदूच्या विकासावरही त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.

वारंवार गरम केलेल्या तेलाचा कॅन्सरशी संबंध?

एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा उच्च तापमानावर गरम केल्याने त्यामध्ये रासायनिक बदल होतात. त्यामुळे तेलाची गुणवत्ता कमी होते आणि आरोग्यासाठी हानिकारक घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरण्याची पद्धत FDA च्या विशेष रडारवर असणार आहे.

मुंढे यांनी या प्रकाराला सर्वात धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मते, हा प्रश्न केवळ भेसळ किंवा काळ्या बाजारापुरता मर्यादित नाही. खाद्यतेलाचा असुरक्षित पद्धतीने वापर हा मोठ्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्येचं कारण ठरू शकतो. काही परिस्थितींमध्ये अशा पद्धती समाजात साथीच्या स्वरूपाची आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

सुटं तेल विकणाऱ्यांवरही FDA ची नजर

खाद्यतेलाची विक्री करताना त्याचा स्रोत आणि उत्पादनाशी संबंधित माहिती स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे. मात्र बाजारात काही ठिकाणी सुटं तेल विकलं जात असल्याचं FDA च्या निदर्शनास आलं आहे. सुटं तेल नेमकं कुठे तयार झालं, कधी तयार झालं, त्याचा निर्माता कोण आहे, याची माहिती अनेकदा स्पष्टपणे उपलब्ध नसते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला असे तेल खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली तर त्यामागचं मूळ उत्पादन शोधणं आणि संबंधितांवर कारवाई करणं प्रशासनासाठी कठीण होतं. याच कारणामुळे खाद्यतेलाच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं FDA आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

तेलाच्या डब्यांचा पुन्हा वापरही नियमबाह्य

खाद्यतेलाच्या पॅकिंगबाबतही FDA ने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. काही उत्पादक तेल भरण्यासाठी वापरलेले डबे किंवा टिन पुन्हा वापरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी अशा प्रकारे टिनचा पुनर्वापर करण्यास नियमांनुसार परवानगी नाही, असं मुंढे यांनी स्पष्ट केलं.

तेल कुठे तयार झालं, त्याची निर्मिती कधी झाली आणि ते ग्राहकापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं, याचा मागोवा घेता येणं अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

उत्पादकांपासून दुकानदारांपर्यंत कारवाई

FDA च्या आगामी मोहिमेत केवळ तेल उत्पादकांवरच लक्ष केंद्रित केलं जाणार नाही. उत्पादन, परवाना, पॅकिंग, वितरण आणि विक्री या सर्व टप्प्यांची तपासणी केली जाणार आहे. खाद्यतेल तयार करणाऱ्या उत्पादकांकडे संबंधित नियमांनुसार आवश्यक परवाने असणं बंधनकारक आहे. तसंच FDA कडून दिले जाणारे आदेश संपूर्ण पुरवठा साखळीतील संबंधितांना पाळावे लागतील.

नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

खाद्यतेलाच्या उत्पादन आणि वापराबाबत नियमांचं गंभीर उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिलाय. उल्लंघनाच्या स्वरूपानुसार, दहा लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद लागू होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ग्राहकाच्या ताटापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियमांचं पालन झालं पाहिजे, हा FDA च्या आगामी मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे.

FDA ची नेमकी चिंता काय?

खाद्यतेलाबाबतचे नियम देशभरात लागू असून, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने तेलाचं उत्पादन, विक्री आणि वापर यासाठी विविध नियम ठरवलं आहेत. मात्र या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचं FDA च्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या बाबतीत अधिक कडक तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

सुटं तेल, चुकीचं पॅकिंग, परवान्याशिवाय उत्पादन आणि विशेषतः एकच तेल वारंवार गरम करून वापरण्याची सवय यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हार्ट अटॅकपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या धोक्यापर्यंत हा विषय पोहोचू शकतो, असा इशारा FDA आयुक्तांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचार

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे? हे 7 हेल्दी पदार्थ ठरतील बेस्ट!

रात्रभर झोप घेऊनही दिवसभर सुस्ती असते? काय आहे कारण?

Crime News : त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हिस्ट्रीशीटर गौरवची हत्या, मित्रानेच केला गेम; नागपुरातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT