लोकसभेनंतर शतप्रतिशतचा नारा देत भाजपनं विधानसभेत विरोधकांना नेस्तनाबूत केलं..... त्यानंतर नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपनं थेट मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला हिसका दाखवलाय...
एकनाथ शिंदेंना ठाणे महापालिकेपुरतं मर्यादित केलं
पुणे आणि पिंपरी चिंचवड हा दादांचा बालेकिल्ला भाजपनं हिसकावला
ठाणे, कोकण पट्ट्यातील शिवसेनेचं वर्चस्व संपवून भाजपनं ताकद वाढवली
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तोडल्यानंतर भाजपची 115 पैकी 58 जागांवर मुसंडी, एमआयएम 33, तर शिंदेसेनेला केवळ 13 जागा मिळाल्या
खान्देशातही भाजपने शिंदेसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या
पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जम बसवला
खरंतर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती.. त्या निवडणुकीत भाजपनं 82 जागांपर्यंत झेप घेतली... मात्र त्यानंतरही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित होत नव्हतं... त्यातच आधी काँग्रेसला कमकुवत केल्यानं भाजपनं 2021 मध्ये आधी शिवसेना आणि 2022 मध्ये राष्ट्रवादी फोडली... त्यानंतर भाजपनं फक्त स्ट्राईक रेटच वाढवला नाही तर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय...
भाजपनं 2209 उमेदवारांना रिंगणात उतरवलं होतं.. त्यापैकी 1400 विजयी झाले.. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट 63.38 टक्क्यांवर पोहोचलाय... तर शिंदेसेनेनं 1493 पैकी 410 जागा जिंकून 27.46 टक्के स्ट्राईक रेट राखलाय... तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 1355 पैकी 12 टक्के स्ट्राईक रेटसह 163 जागा जिंकल्या आहेत... काँग्रेसचे 1359 उमेदवारांपैकी 357 उमेदवार विजयी झालेत.. त्यामुळे काँग्रेसचा 26.27 टक्के इतका स्ट्राईक रेट आहे. तर ठाकरेसेनेनं 1275 पैकी 155 जागांसह 12.15 टक्के स्ट्राईक रेट राखलाय... तर पवारांच्या राष्ट्रवादीनं 533 पैकी 35 जागा जिंकून 6.56 टक्के स्ट्राईक रेट नोंदवलाय..
खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ म्हटलं होतं.. तर शरद पवारांना गुरु.. मात्र त्यानंतरही भाजपनं त्यांचे पक्ष फोडले.. दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं संख्याबळ कमी असतानाही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं.. मात्र आता त्याच शिंदे आणि अजित पवारांचे पंख छाटायला सुरुवात केलीय.. याच अर्थाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप विरोधी पक्षांसोबतच छोट्या पक्षांना गिळणारा शार्क असल्याचं म्हटलं होतं...
भाजपनं विधानसभेपाठोपाठ आता मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या महत्वाच्या महापालिका हाती ठेऊन विरोधकांसह मित्रपक्षांनाही सूचक संकेत दिलेत... त्यामुळे भाजपच्या अजस्त्र ताकदीपुढे टिकण्यासाठी विरोधकांसह मित्रपक्षांनाही मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.