शरद पवार गटाचे पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नातू शरद लाड यांनी मंगळवारी अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजीत देशमुख, आ. मनोज घोरपडे, आ. पृथ्वीराज देशमुख, आ.अमल महाडिक,सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे समित कदम, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामुळे नवभारत घडत आहे. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. तुम्हा सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे. बारा बलुतेदारांना न्याय देऊन उन्नती साधण्याचे काम सुरू आहे. ज्या विश्वासाने आज सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरू अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली
मोठ्या संख्येने भाजपामध्ये होत असलेले प्रवेश पाहता विरोधकांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार शोधण्याची पाळी येणार आहे असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड आणि आज होत असलेल्या इतर प्रवेशांमुळे भाजपाची ताकद परिसरात वाढणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लाड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यकुशलता, दूरदृष्टी यांने प्रभावित होऊन विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. हे नेते पाठीशी असतील तर देश आणि राज्याचा विकास नक्की होणार हा विश्वास सर्वांना आहे. पलुस कडेगावचा युवक भाजपाकडे आशेने बघत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी असलेला पक्ष भाजपा, याकडे आम्ही आकृष्ट झालो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी झोकून देऊन काम करू अशी ग्वाहीही लाड यांनी दिली.
सांगलीतून शरद लाड यांच्यासोबत क्रांती साखर कारखाना माजी उपाध्यक्ष पोपट सकपाळ, कारखान्याचे माजी संचालक पोपट फडतरे, माजी जि.प. सदस्य नितीन नवले, ब्रह्मनाळचे उपसरपंच सुभाष वडेर, उपसरपंच संभाजी पाटील, महेंद्र करांडे, भगवंत पाटील आदींचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये श्री विठ्ठल रखुमाई विकास सेवा संस्थेचे चेअरमन दिग्विजय पाटील, विश्वनाथराव पाटील, कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळाचे अध्यक्ष सत्यजित पाटील, माजी नगरसेवक जगन्नाथ पुजारी, एम .बी.मेंडके, संपत कोळी, गजानन साळोखे, रामचंद्र चौगुले, सामाजिक कार्यकर्ता सम्राट मसवेकर आदींचा समावेश आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये पार्ले गावचे माजी सरपंच आणि शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, शहापूर तालुक्यातील वि. से. सो चे चेअरमन दत्तात्रय शेलार, कोपर्डी हवेलीचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जालिंदर चव्हाण, कामगार नेते नवनाथ पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर पाटील आदींचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.