(तरबेज शेख)
एकीकडे एमडी ड्रग्जप्रकरणी संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या ड्रग्जप्रकरणावरून दोन महिला नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झालीय. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. हा वाद इतका टोकाला गेलाय की देवयानी फरांदे ह्या सुषमा अंधारे यांच्यावर थेट हक्कभंग प्रस्ताव अधिवेशनात मांडणार आहेत.
तीन महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी नाशिकच्या वडाळा गावात एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नसरीन शेख ऊर्फ छोटी भाभी हिच्यासह आणखी काही साथीदारांना अटक केली. या वडाळा गावातील एमडी ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने यात 'छोटी भाभी' सह 'बडी भाभी' या पात्राची देखील चर्चा रंगू लागली. दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांना काही दिवसांपूर्वी एक निनावी पत्र मिळाले. सुषमा अंधारे यांनी हे पत्र समाज माध्यमांवर आणि त्याचप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तांना देखील दिले. त्यानंतर हे पत्र संपूर्ण राज्यभरात व्हायरल झालं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पत्रात 'बडी भाभी' असा उल्लेख करण्यात आला होता. यात 'बडी भाभी' म्हणजे नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा उल्लेख होता. त्यामुळे एकूणच एमडी ड्रग्ज प्रकरणात देवयानी फरांदे संशयाच्या भोवऱ्यात आल्या. सुषमा अंधारे यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या देवयानी फरांदे यांच्यावर आरोप केले आणि एकूणच यानंतर देवयानी फरांदे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची माहिती दिली.
देवयानी फरांदे यांच्या या भूमिकेनंतर सुषमा अंधारे यांनी आपली बाजू मांडलीय. आपल्याला मिळालेले पत्र हे निनावी असल्याने त्याला कुठलीही कायदेशीर बाजू नव्हती. त्यामुळे या पत्रातील नावे कुठेही उघड केली गेली नव्हती. मी केवळ 'छोटी भाभी' उर्फ नसरीन शेख हे नाव घेतले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अनेकदा मला 'बडी भाभी' कोण, याबाबत विचारणा केली. मात्र मी कुठेही नाव सांगितले नाही, अशी स्पष्ट भूमिका अंधारे यांनी मांडली. देवयानी फरांदे यांचे नाव घेतले नसतानाही, त्यांनी उगीचच संपूर्ण चर्चेचा सूर स्वतःकडे वळवून घेतला अशी टीका अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे यांच्याकडे काही पुरावे असल्यास, त्यांनी ते पुरावे द्यावे, असे थेट आव्हान देवयानी फरांदे यांनी दिलेत. ड्रग्ज प्रकरण मी स्वतः उघडकीस आणल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच माझ्यावर आरोप केले जात आहे, असेही प्रत्युत्तर फरांदे यांनी दिलं. एवढेच नाहीतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ड्रग्स प्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही, मात्र आमच्या गृहमंत्र्यांनी करोडो रुपयांच्या ड्रग्जवर कारवाई केलीय, अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.