मुंबईतील वरळी डोम येथे नुकताच ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर महायुतीतील नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्याला 'रूदालीचं भाषण' अशी उपमा दिली. यावर आता उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना जशास तसं उत्तर दिलं. 'मूळ भाजप मेला आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानभवनाबाहेर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांसमोर भाजपावर टीका केली. 'खरंतर मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण मूळ भाजप मेला आहे. त्याची हत्या या लोकांनी केली. त्यांनी उर बडवायला आमच्या पक्षातून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि देशभरातील पक्षातून उरबडवे घेतले आहेत. कारण या लोकांनी मूळ भाजपला मारून टाकलंय', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 'उर बडवायला त्यांच्याकडे मूळ भाजपची माणसं नाहीयेत. त्यांना ही माणसं इतर पक्षातून घ्यावी लागत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया समजू शकतो. पण मराठी माणसाचे आनंदाचे क्षण त्यांना रूदाली वाटत असेल, तर ही अतिशय विकृत वृत्तीची माणसं आहेत' असं ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शनिवारी वरळी डोममध्ये विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे या दोघांची भाषणं झाली. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूदालीची उपमा दिली. 'मला सांगण्यात आलं होतं की, वरळी डोममध्ये विजयी मेळावा पार पडत आहे. पण त्या ठिकाणी रूदालीचे भाषण झाले. मराठीबद्दल एक शब्द न बोलता, तिथे आमचं सरकार पाडलं, आम्हाला निवडून द्या, असा प्रकार सुरू होता. मुळात त्यांना त्रास याचा आहे की, महापालिका निवडणूक जवळ येत असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करू शकले नाहीत', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.