बीड : अवैध वाळू वाहतूकिचा प्रश्न सर्वत्र भेडसावत आहे. प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करण्यात आल्यानंतर देखील सर्रासपणे वाळू वाहतूक होत असते. दरम्यान वाळूच्या वाहतुकीवरून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. अधिवेशनात तर वाळूच्या ३०० हायवा राजरोस सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफीयांना दणका दिला असून सहा हायवा मालकांना तब्बल २२ कोटींचा दंडाची नोटीस बजावली आहे.
नदीमधून वाळू उपसा करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे वाळू वाहतूक करण्यात येत असते. रात्रीच्या वेळी याचे प्रमाण अधिक असते. वाळू माफियांकडून कारवाईसाठी गेलेल्या पथकांवर देखील हल्ला केला जात असतो. हिवाळी अधिवेशन सुरु असताना जळगाव जिल्ह्यात तलाठ्यावर हल्ला झाल्याने हा मुद्दा अधिवेशनात देखील मांडण्यात आला होता. यात बीड जिल्ह्यात होत असलेल्या वाळू वाहतुकीचा मुद्दा चांगलाच गाजला होता.
सीसीटीव्ही फुटेजवरून पाहणी
दरम्यान यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांना कारवाईचा दणका दिला आहे. यासाठी जिल्हाधिकारी पाठक यांनी धुळे- सोलापूर महामार्गावरील टोल नाक्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या वजनांचा डेटा हस्तगत करत आता माफियांना दणका देण्याचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वाळू वाहतूक करत असलेल्या डंपर मालकांना नोटीस देण्यात येत आहे.
सहा जणांना २२ कोटींची दंडाची नोटीस
यात २६९ अवैध ट्रिप वाळू वाहतूक केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आल्यानंतर त्या हायवा मालकाला ७ कोटी ३६ लाख १० हजार ७८६ रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनतर आता आणखी ५ हायवा मालकांना १४ कोटी ७२ लाख २ हजार ७७९ अशी नोटीसा बजावल्या आहेत. असा एकूण सहा हायवांना 22 कोटी 8 लाख 13 हजार 566 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.