योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झालेली सर्वात मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला यश आले. बंद घर हेरून कुलूप तोडत तब्बल ५३ तोळे सोनं, पावणेदोन किलो चांदी आणि साडेपाच लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती. चोरी केल्यानंतर पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आरोपींनी केलेले कृत्य एखाद्या फिल्मी कथेलाही लाजवणारे आहे. मात्र, बीड पोलिसांनी तलावाच्या घाण पाण्यात उड्या मारून डीव्हीआर (DVR) शोधून काढला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
असा रचला घरफोडीचा कट
अंबाजोगाई शहरातील सारडा यांचे घर बंद असल्याचे पाहून अमर काकासाहेब थोरात या रिक्षाचालकाने रेकी केली. त्यानंतर त्याने सराईत गुन्हेगार जगजितसिंग अचलसिंग दुधानी आणि फरार मंगलसिंग बावरी यांच्या मदतीने घरफोडी केली. चोरी केल्यानंतर या तिघांनी अंबाजोगाईतील एक तलाव गाठला. तलावाच्या काठावर बसून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि रोकडीची आपापसात वाटणी करण्यात आली.
पुरावे नष्ट करण्यासाठी तलावात फेकला DVR
पोलिसांनी आपला माग काढू नये म्हणून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हातमोजे, जॅकेट, कपडे आणि घरून चोरलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर थेट तलावाच्या घाण पाण्यात फेकून दिला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या हाती संशयितांचे धागेदोरे लागले. तपासादरम्यान आरोपींनी डीव्हीआर तलावात फेकल्याचे समजताच पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तलावात उड्या मारून तो डीव्हीआर बाहेर काढला. या डीव्हीआरमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार
तपासाची माहिती मिळताच पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर थोरात आणि जगजितसिंग दुधानी या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २७ तोळे सोनं आणि ८५८ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. तर मंगलसिंग बावरी हा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बीड पोलिसांची २०२६ मधील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.