Maharashtra Assembly Elections saam tv
महाराष्ट्र

Assembly Elections: दादाजी भुसे पाचव्यांदा आमदार होणार की शिंदेंना धक्का बसणार? काय आहे मालेगाव मतदारसंघाचं चित्र?

Bharat Jadhav

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलंय. बाळासाहेबांची खरी शिवसेना आम्हीच आणि आमचं खरं हिंदुत्व असा प्रचार करत फिरणाऱ्या महायुतीला जनता जनार्दनाने लोकसभेत जोरदार झटका दिला. केंद्रात आणि राज्यातील लोकसभेचे निकाल पाहता जनतेमध्ये मोठी नाराजी असून त्यांनी महायुतीला पू्र्ण बहुमत देण्यास हात आखडता घेतला.

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच रणसंग्राम होणार आहे. ही लढाई भाजपसाठी तर महत्त्वाची आहेच, पण त्यापेक्षा शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. याच निवडणुकीतून जनतेने त्यांना स्वीकारलं की नाही हे समजणार आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत, असा प्रचार करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde) आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या ४० आमदारांना आपला करिष्मा या निवडणुकीत दाखवा लागणार आहे. दुसऱ्या बाजुला ठाकरे नावाचा करिष्मा काय असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील.

शिंदेंच्या गटातील महत्त्वाच्या आमदारांमधील एक नाव म्हणजे दादाजी भुसे. दादाजी भुसे (Dadaji Bhuse )हे एकनाथ शिंदे यांचे नीकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे मालेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या भुसेंसाठी हे निवडणूक महत्त्वाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे. दरम्यान प्रस्थापित प्रशांत हिरे यांचं राजकीय साम्राज्य उद्धवस्त करणारे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दादाजी भुसेंचा वर्चस्व कायम आहे. दाभाडी विधानसभा मतदारसंघ त्यानंतर मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवलाय. गेल्या चार टर्मपासून भुसे यांनी आपल्या नावाचा डंका या मतदारसंघात कायम ठेवलाय.

मालेगावबाह्य मतदारसंघात भुसे यांनी आपली सत्ता कायम ठेवली जरी असली तरी यावेळीची निवडणूक त्यांच्यासाठी चुरशीची असणार आहे. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठापणाला लागलीय. दादाजी भुसे हेही एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होते, आता सरकारमध्ये ते मंत्रीदेखील आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदारांनी शिंदे यांच्या उमेदवारांना हवी तितकी पसंती दिली नाहीये. पण महायुतीतील स्ट्राइक रेट बघता शिंदेंनी सरशी घेतलीय.

एकनाथ शिंदे हेही मतांची टक्केवारी देऊन आपल्याला पंसती असल्याचं सांगत आहेत. पण ते खरं लोकांच्या मनात ते जागा निर्माण करण्यात यशस्वी झालेत का? हे, आता स्थानिक तालुका पातळीवरील विधानसभा निवडणुकीतून सिद्ध होणार होणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यात प्रत्येक राजकीय पक्षाचं वर्चस्व किती आहे, हे सिद्ध होणार आहे. आमदार हा स्थानिक लोकांशी जास्त जोडलेला असतो. त्यामुळे आमदारांचं पलायन आणि शिवसेनेतील बंडखोरी लोकांना किती आवडली, याचं उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे.

असा आहे मतदारसंघ

मालेगाव मतदारसंघ मध्य आणि बाह्य अशा दोन विभागात मोडतो. दोन्ही विभागात दोन विरुद्ध टोकच्या विचारधारा ठेवणाऱ्या पक्षांचे आमदार निवडून आलेत. मालेगाव मध्य मध्ये एमआयएमचे आमदार आहेत, तर बाह्य मालेगाव मतदारसंघात शिवसेनेचे आमदार दादाजी भुसे निवडून आलेत. मालेगाव (मध्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते २० आणि २६ ते ६५ यांचा समावेश होतो. मालेगाव (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा धुळे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दादाजी दगडू भुसे हे १,२१, २५२ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे डॉ. तुषार रामकृष्ण शेवाळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दादाजी भुसे ८२,०९३ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे पवन ठाकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर २००९ साली देखील भुसे यांनी मोठा विजय मिळवला होता.

२००९ मध्येही भुसे यांनी विजय मिळवला होता, यात त्यांना ९५,१३७ मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रशांत व्यंकटराव हिरे राहिले होते. त्यांना ६५,०१७ मते मिळाली होती. भुसेंना ५२.७५ टक्के असे मते मिळाली होती. तर हिरे यांना ३६.०८ टक्के मते मिळाली होती.

मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ३,४१,६१५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला होता. २०१९च्या विधानसभेला मालेगाव मतदारसंघात ५९.७ टक्के इतकं मतदान झालं होते. यात शिवसेनेचे उमेदवार दादाजी भुसे यांनी मोठा विजय मिळवला होता.

दादाजी भुसे यांना ५९.५९ टक्के मते मिळाली होती. १,२१,२५२ मतांनी भुसे यांनी या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांना ३६.१६ टक्के मते मिळाली होती. ७३,५६८ मत घेत ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राहिलेत.

मालेगावमधील पुण्यनगरीचे उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे नरेंद्र देसले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. भुसेंना पुन्हा विजयश्री मिळणार असल्याचं चिन्ह सध्या दिसत असल्याचं देसले म्हणालेत. दादाजी भुसेंच्याविरोधात दमखक दाखवणारा कोणताच नेता नाहीये. भुसेंच्याविरोधात कितीही प्रचार केला तरी त्यांचा प्रभाव अजूनही २००९ प्रमाणे आहे. त्यामुळे ते पाचव्यांदा आमदारकी भुषवणार असल्याचं म्हटलं जात आहे. लोकांना जरी बंडखोरी आवडली नसली तरी विरोधकांकडे हवा तसा तगडा उमेदवार नाहीये, त्यामुळे पुन्हा दादाजी भुसे आमदार होणार यात शंका नाही, असं पत्रकार देसले म्हणालेत.

या विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकीत (Election) भुसे यांचाच विजय होईल असं वाटत असलं तरी त्यांच्यासाठी ही लढाई चुरशी ठरेल.मालेगावची राजकीय स्थिती ही फार वेगळी आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती असली तरी येथील स्थानिक नेत्यांमध्ये रस्सीखेच आणि श्रेयवादाची लढाई कायम राहिलीय. भाजपचे नेते सुनिल आबा गायकवाड यांचा आणि भुसे यांच्यात राजकीय वाद आहे.

शिवाय आता उद्धव ठाकरे गटातून वेगळे झाल्यामुळे मातोश्रीवरुन दादाजी भुसे यांना चीतपट करण्यासाठी सुत्र हलवली जात असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपण भुसे यांचा पर्यायी उमेदवार शोधणार असल्याचं म्हटलं होतं. जर तसा पर्याय मिळाला तर दादाजी भुसे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्व गमावणारी ठरेल.

यावर बोलतांना पुण्यनगरीचे उपसंपादक नरेंद्र देसले म्हणाले, दादाजी भुसे यांना अद्वय प्रशांत हिरे हे पर्याय बनू शकतात. परंतु अद्वय हिरे यांचा हवा तसा जनसंपर्क नाहीये. तसेच ते सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे हिरे हे भुसे यांना तगडी टक्कर देतील असं वाटत नाहीये. त्यामुळे त्यांना टक्कर देईल असा कोणताच उमेदवार मालेगाव बाह्य मतदारसंघात नाहीये. विरोधकांना भुसे यांच्या इतका जनसंपर्क असलेला उमेदवार येथे उभा करावा लागेल.

भुसेंचे आधी सहयोगी असलेले बंड काका बच्छाव हे त्यांचा पर्याय बनवू शकतात, परंतु त्यांनी अद्याप कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाहीये. पण बच्छाव हे भुसेंविरोधात दंड थोपटतील याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या विधानसभेत विरोधक काय डावपेच आखातात हे पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT