Nandgaon Assembly Election 
महाराष्ट्र

Assembly Election: नांदगावची जनता कोणासोबत नांदणार? काय आहे मतदारसंघाची स्थिती, कसं असणार विधानसभेचं मैदान?

Bharat Jadhav

एकनाथ शिंदेच्या बंडात सहभागी झालेले सुहास कांदे परत एका उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे छगन भुजबळही पुन्हा एकदा गेलेलं आपलं साम्रज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, असं म्हटलं जात आहे. मात्र दोन्ही नेते महायुतीतील नेते आहेत, यामुळे यंदाची विधानसभा कशी असेल कोणाला उमेदवारी मिळू शकते. मागील विधानसभा निवडणूक कशी झाली, याचा आढावा आपण या लेखातून घेऊ.

कोणाला मिळेल उमेदवारी

नांदगावमध्ये सुहास आण्णा कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वर्चस्व संघर्ष सर्वांनाच माहितीये. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभादेखील याच संघर्षामुळे चर्चेत राहणार आहे. परंतु दोन्ही नेते आता सध्या महायुतीमध्ये असल्याने ही विधानसभा निवडणूक कशी होईल याची उत्सुकता सर्वांना लागलीय. याच कारणामुळे इतर जागांप्रमाणे या मतदारसंघातदेखील उमेदवारीवरून महायुतीचं घोड अडू शकतं. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटपाचा निर्णय झाला नाहीये.

तसेच नांदगावमधून कोणाला उमेदवारी दिली जाईल, यावरही अद्याप कोणतीच चर्चा नाहीये. नांदगावमध्ये सत्ता साबूत ठेवण्यासाठी उमेदवार राजकारण, समाजकारण, जातीच्या राजकारणाचं शस्त्र बाहेर काढत आपला प्रचार करतील, असं एकंदरीत चित्र दिसत आहे. यावेळी स्थानिक नेता कोण आहे? सर्वांना समावून घेणारा नेता कोण, कोण आहे आयात उमेदवार या मुद्द्यावरून मतदारांना आपला आमदार निवडावा लागणार आहे.

उमेदवारांची तयारी

नांदगाव मतदारसंघ आधी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाकडे होता, मात्र मागील वर्षांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवारांचे या मतदारसंघावर वर्चस्व दिसून येत आहे. आता सध्या शिंदे गटाची सत्ता असून सुहास कांदे तेथे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीपासून आमदार सुहास कांदे यांनी कामांचा धडाका सुरू केलाय. कांदे यांच्या पक्षातील पदाधिकारी सांगतात, ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे, त्यादृष्टीने कामांना सुरुवात केलीय.

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र आज-उद्याच निवडणुका होतील,अशाच अंदाजाने कामांना पूर्णस्वरुप देण्याचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजुला महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपनेही आपली तयारी सुरू केलीय. पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झालीय. प्रत्येक मतदान केंद्र मजबूत करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्याचवेळी लोकसभेत मतदानावर पडलेल्या प्रभावाचा आढावाही भाजपकडून घेतला जात आहे.

भाजपची तयारी

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचं ठरलं तरीही भाजप तयार असल्याचं भाजप नेते पंकज खताळ यांनी सांगितलं. प्रत्येक बुथ मजबूत करणं तेथील पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचं काम चालू असल्याची माहिती खताळ यांनी दिली. लोकसभेत अजित पवार गट आणि शिवसेना सोबत राहुनही मतदान कमी झालं. मागील लोकसभेच्या तुलनेत यावेळी ३३००० मते कमी पडली. याला कांदा निर्यात, मराठा आरक्षणाचा प्रश्न कारणीभूत आहे. यावर मतदारांशी चर्चा केली जात आहे. त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर केले जात आहेत.

लोकसभेच्या विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह चालवला. चारशे पार आल्यानंतर संविधान बदललं जाणार असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता. हे कारण आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची बुथवरील मेहनत कमी पडली असेल किंवा कार्यकर्ते भ्रमात राहिले का? का विजय आपलाच आहे, असा अतिविश्वास नडला, याचा विचार केला जात असल्याची माहिती खताळ यांनी दिली. यावर अधिक माहिती देताना ते म्हणातात, कार्यकर्ते भ्रमात राहिल्याने ते सामान्य मतदारापर्यंत पोहोचले नाहीत. मतदारांना मतदान केंद्रात खेचून आणण्यात अपयशी राहिलेत. याचमुळे मतदार मतदान करण्यासाठी आले नाहीत, त्याचाच परिणाम मतांच्या टक्केवारीवर पडला.

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी कमी राहिली. यासर्व घटकांवर काम केलं जातं आहे. यंदाच्या लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत असं होऊन नये, यादृष्टीने काम केलं जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून मतदारसंघातील मोर्चेबांधणी करण्याचं काम केलं जात असल्याचं खताळ म्हणालेत.

असा आहे मतदारसंघ

नांदगावमध्ये आधी स्वातंत्र्यानंतर सलग सहावेळा कॉंग्रेसच्या उमेदवारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ १९९० मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आमदारकी खेचून आणली होती. नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. कम्युनिस्ट पक्षाकडे असलेल्या या मतदारसंघावर १९९५ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकला.

युतीच्या लाटेत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचत पहिल्यांदाच राजेंद्र देशमुख हे शिवसेना-भाजप युतीचे आमदार झाले. त्यानंतर २००४ पर्यंत हा मतदारसंघ युतीच्या ताब्यात राहिला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसने विजय मिळवत आपल्याकडे हा मतदारसंघ घेतला. त्यावेळी अॅड.अनिल आहेर हे आमदार झाले होते.

मग २००९ मध्ये मात्र नांदगाव मतदारसंघात भूकंप झाला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदारसंघाची अदलाबदल झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने हा मतदारसंघ आपल्याकडे मागवून घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नव्हती. तेथून पंकज भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. विशेष म्हणजे पंकज भुजबळ हे तेथील स्थानिक नेते नसतानाही ते दोनदा आमदार झाले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला.

त्यावेळी पंकज भुजबळ यांना ९६ हजार २९२ मतं मिळाली होती, तर संजय पवार यांना ७४ हजार ९२३ मतं मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी सुहास कांदेंचा १८ हजार ४३६ मतांनी पराभव केला होता. सुहास कांदेंना ५० हजार ८२७ मतं मिळाली होती, तर पंकज भुजबळ यांना ६९ हजार २६३ मतं मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्थानिक आणि बाहेरचे आमदार याच मुद्द्यावरून सुहास आण्णा कांदे यांनी आपला प्रचार सुरू केला, जनसंपर्क वाढवला लोकांची कामे केली, त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले. मतदारसंघातील लोकांच्या सुख-दु:खात ते जाऊ लागले. या गोष्टींमुळे त्यांनी जनतेशी आपली नाळ जोडली आणि २०१९ मध्ये विजय मिळवून आणला.

जाणकारांना काय वाटतं

पंकज भुजबळ यांचा जनसंपर्क नसल्याने ते २०१९ मध्ये पराभूत झालेत. विशेष म्हणजे आता विधानसभेसाठी त्यांना उमेदवारीसाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा असूनही त्यांनी जनसंपर्क वाढवला नाहीये. मतदारसंघातील त्यांचा कमी वावर हा त्याच्या पराभवाचं कारण ठरू शकतं. छगन भुजबळ व्यक्तीरिक्त कोणीही उभे राहिलं तरी तेथे सुहास कांदे हे विजयी होतील, असा दावा मालेगाव पुण्यनगरीचे उपसंपादक नरेंद्र देसले करतात.

आपल्या दाव्याची पृष्टी करताना नरेंद्र देसले म्हणतात, सुहास कांदे यांची जनतेशी नाळ मजबूत आहे. मतदारसंघातील जनतेच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला, लग्न समारंभाला ते हजेरी लावत असतात. विकासकामे केली आहेत. जनतेच्या मनात त्याची साधेपणाची आणि आक्रमक आण्णाची इमेज बसलीय. तर त्यामुळे यावेळीही सुहास कांदे विजय मिळवतील असं ते म्हणतात.

परिस्थिती मात्र वेगळी

सुहास कांदे यांनी आपली तयारी जरी सुरू केली असली तरी त्यांना विजयाबाबत शंका जाणवत आहे. भुजबळ यांच्याशी त्यांचा असलेला संघर्ष, आणि मराठा आरक्षणाचा त्यांचा विरोध यामुळे त्यांना एम फॅक्टरची भीती जाणवत आहे. लोकसभेत मनोज जरांगे यांची सरकारविरोधी भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता. त्याचा फटका आता विधानसभेत बसू शकतो, असं म्हटलं जात आहे. त्यात भाजपनेही आपली तयारी सुरू केलीय.

अर्थात जर महायुती राहिली नाही तर भाजप आपला उमेदवार येथे देणार आहे. विधानसभेत जर महायुती राहिली तर आम्ही जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करून त्याला जिंकून आणू. पण जर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भाजपकडून तशी तयारीही चालू असल्याची माहिती पंकज खताळ यांनी दिलीय. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यादृष्टीने आम्ही काम करणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपच्या अंतर्गत बैठकीत स्वबळाबाबत चर्चा झालीय.

जर महायुती राहिली नाही तर उमेदवारीसाठी मी दावेदार असून मतदारसंघात आपलं कामे तशी चालू आहेत, पक्षाकडून तसे निर्देश असल्याची माहितीही खताळ यांनी दिली. एम फॅक्टरवर बोलतांना ते म्हणाले की, मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान अधिक आहे. आपणही त्याच समाजाचं प्रतिनिधीत्व करत आहोत, त्यामुळे एम फॅक्टरचा परिणाम होणार नसल्याचा दावा खताळ यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT