अमर घटारे, साम टीव्ही अमरावती
अमरावती : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती सरकार खडबडून जागं झालं. विधानसभेआधी त्यांनी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. दरम्यान, ही योजना घराघरात पोहचवावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून जाहिरातबाजीवर मोठा खर्च देखील करण्यात येत आहे.
त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला असून काही दिवसांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देखील होणार नाही, अशी भीती विरोधक व्यक्त करत आहेत. अशातच सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी नेमके किती पैसे खर्च केले याची माहिती समोर आली आहे. अमरावती येथील रहिवासी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी ही माहिती समोर आणली आहे.
अजय बोस यांनी राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याला यासंदर्भातील माहिती मागितली होती. ही माहिती त्यांना प्राप्त झाली असून त्यानुसार, आतापर्यंत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी आतापर्यंत तब्बल २००० कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये प्रसिद्धी माध्यमे, वृत्तपत्र, दूरदर्शन वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या, राज्यातील 16 एफएम रेडिओ चॅनलमधील जाहिरातींचा समावेश आहे.
इतकंच नाही तर, रेल्वे स्थानकावरून ध्वनी क्षेपणाद्वारे ऑडिओ जिंगल, मुंबई शहरातील बेस्ट बस स्टॉप तसेच राज्यातील अनेक शहरांमधील बस स्थानकावर लावलेल्या जाहिरातींवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. फक्त जाहिरातबाजीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने पैसे खर्च केल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून प्रत्येकी ४५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत देखील वाढवली होती. आज १५ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपणार असून महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.