बळीराम सिरस्कार यांनी शिंदे गटाचा राजीनामा देत पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.
सिरस्कार यांनी गेल्या पाच वर्षांत पाच वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला.
महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बाळापूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Baliram Sirskar Joins BJP Again: अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकिटासाठी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला होता. शनिवारी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतलाय.
यानिमित्ताने 5 वर्षात वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि परत भाजप असं ५ पक्षांच्या पक्षांतराचं 'पंचक' पूर्ण केलंय. मात्र, या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केलेली वक्तव्य महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रवेशवेळी बोलताना माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लावल्यानंतर एक वेळाही शिंदेंच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नसल्याचं अभिमानानं सांगितलंय. तर भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसतानाही त्यांना शिंदेंच्या तिकिटावर बाळापूरातून लढावं लागल्याचं म्हटलंय. शिंदेंनी बाळापुरात भाजपातून उमेदवार आयात करताना आपल्याच पक्षातील अनेक इच्छुकांवर अन्याय केल्याचं बोललं जात आहे.
बळीराम सिरस्कार हे 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 अशी दोन टर्म वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले आहेत. दरम्यान, राजकीय कोलांटउड्या मारणाऱ्या माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.