Akola Farmer News : काबाड कष्ट करून पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जातात. रात्रभर ते जीव मुठीत धरून पिकांना पाणी देत असतात. अनेकदा ही गोष्ट त्यांच्या जीवावरही बेतली जाते. अशीच दुर्देवी घटना एका तरुण शेतकऱ्यासोबत घडली. (Latest Marathi News)
शेतात जाऊन पिकांना पाणी देऊन लवकर घरी येतो, असं म्हणत आईसह तरुण शेतकरी भल्यापहाटे शेतात गेला. मी मोटार चालू करतो तू इथेच थांब असं म्हणत तो विहिरीजवळ गेला. मात्र, नियतीला हे मान्य नव्हतं. त्याचा विजेचा जबर शॉक लागला आणि तो विहिरीत कोसळला.
दुर्देवी बाब म्हणजे, त्याचवेळी विहिरीच्या पाण्यात सुद्धा करंट उतरलेलं होतं. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या पोटच्या गोळ्याला डोळ्यादेखत मरताना पाहून आईने हंबरडा फोडला. मात्र, पहाटची वेळ असल्याने कुणीही मदतीला धावून आलं नाही.
अखेर आईच्या नजरेसमोरच मुलाने प्राण सोडला. काळजाचा ठोका चुकवणारी ही दुर्देवी घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी गावात घडली. मंगेश फाळके (वय ३२) असं या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक मंगेश हा आईसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आता घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने फळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी गावात मंगेश फाळके (वय ३२) यांचं कुटुंब (Farmers) वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यामध्ये गव्हाचे पिक घेतलं आहे. दरम्यान रब्बी हंगामातील गव्हाला सध्या पाणी देणे सुरू आहे. मंगेश आणि त्यांची आई हे नियमितप्रमाणे पहाटेच्या सुमारास शेतात गेले होते.
गव्हाला पाणी देण्यासाठी ते कॅनॉलजवळ गेले आणि तिथे त्यांनी पाण्याची मोटर सुरू केली. परंतू मोटर सुरू झाली नाही. मोटर का सुरू झाली नाही? हे पाहण्यासाठी मंगेश यांनी मोटरची बारकाईने पाहणी केली. परंतु पाहणी करत असताना मोटर पंपमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यात त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात मंगेश यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगेश फाळके यांच्या वडिलांचं दोन वर्षांपुर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्वात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. चारही मुलींचे लग्न झाले असून मुलगा मंगेश हा सर्वात लहान आहे. वडिलांच्या निधनानंतर आई, पत्नी अन् स्वतःच मुलगा यांची जबाबदारी मंगेश यांच्या खांद्यावर आली. आता कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गेल्याने अख्ख कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.