Ajit Pawar’s Party Worker Commits Suicide in Solapur : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरमधील युवा पदाधिकाऱ्यानं टोकाचं पाऊल उचलले. सोलापूरमध्ये अण्णा नावाने ओळखले जाणारे ओंकार हजारे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेय. गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. ओंकार हजारे यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस तपास सुरू आहे. कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे (वय ३२, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. ८ जून) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळपासून ओंकार हजारे कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले होते. बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधाशोध करूनही ते सापडले नाहीत. अखेर सुपर मार्केटजवळ त्यांची गाडी थांबलेली आढळली. गाडीत ते बेशुद्ध अवस्थेत सीटवर बसलेले दिसले. त्यांना आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गाडीचा दरवाजा तोडला असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ओंकार यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निकटवर्तीयांच्या मते, मागील काही महिन्यांपासून ते कौटुंबिक कारणांमुळे निराश होते. विशेष म्हणजे, त्यांच्या मेव्हण्याचे रविवारी लग्न होते, परंतु त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे सांगितले जाते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.