सचिन बनसोडे
राहुरी (अहिल्यानगर) : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री जात असतात. त्यानुसार पहाटेच्या सुमारास शेतात जात असलेल्या शेतकरी सोबत विपरीतच घडले. दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत शेतकऱ्याला शेतात फरफटत नेले. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील पिंपळदरा, वडनेर शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील पिंपळदरा, वडनेर भागात राहणारे शोभाचंद सिताराम गव्हाणे (वय ५०) असे घटनेत मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शोभाचंद गव्हाणे हे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताला पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. त्याच शेतात काही अंतरावर नरभक्षक बिबट्या दबा धरून बसलेला होता. शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्या नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.
बिबट्याने शीर केले धडावेगळे
बिबट्याने हल्ला करत शोभाचंद यांना बाजूच्याच मक्याच्या शेतात फटफटत नेले. यात बिबट्याने त्यांचे पोट फाडले. तसेच शिर धडावेगळे केले. यातच शोभाचंद गव्हाणे यांचा जागेवर मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. मात्र उशीर होऊन देखील शोभाचंद हे घरी न आल्याने त्यांचे कुटुंब शेतात गेले असता त्यांना छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला. हा मृतदेह पाहून कुटुंब हादरले होते.
गावात भीतीचे वातावरण
दरम्यान घटनेची माहिती गावात मिळाल्याने ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ताबडतोब या बिबट्याचा बंदोबस्त करून वन विभागाने त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि प्राणघातक हल्ले चिंतेची बाब बनली आहे. वन विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.