अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली आहे. या घटनेनं गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गोगलगाव येथील १९ वर्षीय साहिल दत्तात्रेय चौधरी आणि १४ वर्षीय किरण नारायण चौधरी हे दोघे चुलतभाऊ कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल आणि किरण हे हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेले.
सध्या निळवंडे धरणातून तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे. दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढलं. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. किरण हा नुकताच आठवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता तर साहिल लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. या घटनेनं चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गोगलगाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाप-लेकाचा जागीच मृत्यू, मनमाडवर शोककळा
देव दर्शन करून घरी परत येताना बाप-लेकावर काळाने घाला घातला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. या घटनेने मनमाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) आणि पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हे तिघे मोटारसायकलवर (एमएच १५ डीएफ ५२११) देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १५ जीके ४३१२) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गंभीर जखमी झाला. जखमी रवींद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.