दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्यावर बिबट्याचा अचानक हल्ला झाला
दोघेही गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत
नागरिकांच्या येण्याने बिबट्या पळून गेला
परिसरात सततच्या हल्ल्यांमुळे भीती व तणावाचं वातावरण पसरलं आहे
अहिल्यानगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास बाईक वरून जाणाऱ्या एका जोडप्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत पती पत्नी गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर घटना ही कोपरगाव तालुक्यात माहेगाव देशमुख परिसरात घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात दोन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले असले तरी तालुक्यात बिबट्यांची दहशत आजही कायम आहे. मात्र काल रात्रीच्या सुमारास भाऊसाहेब वाघडकर आणि त्यांची पत्नी आशाबाई वाघडकर यांच्यासह दुचाकीवरून कोपरगावकडे जात होते.
या दरम्यान मारुती मंदिराजवळ दबा धरून एक बिबट्या शेतात बसला होता. अंधाराची संधी साधून दबक्या पावलाने येत या नरभक्षक बिबट्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर झडप घातली. या दुर्घटनेत दुचाकीवर बसलेले वाघडकर दांपत्य खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांच्या आवाजाने आजूबाजूला असलेले नागरिक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या येण्याने बिबट्याने पळ काढला. मात्र या हल्ल्यात दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या होणाऱ्या सलग हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.पूर्वी गावाकडची माणसं वेळीअवेळी बाहेर पडायची. अगदी रात्रीच्यासुमारास बाहेर फेरफटका किंवा शिकारीला जायची मात्र अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले होत नसत. आता मात्र सर्रास बिबट्याची संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.