अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक: राज्यात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून या वाढत्या तापमानाचा फटका आता लहान बालकांनाही बसू लागला आहे. इंदापूरहून नाशिकला लग्नासाठी आलेल्या एका 4 महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील काटेकर कुटुंब एका विवाहसोहळ्यासाठी खासगी ट्रॅव्हलने नाशिकला आले होते. नाशिकरोडच्या सामनगाव रोड परिसरातील एका लॉन्सवर हा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, प्रवासादरम्यान बसमधील उष्णतेचा मोठा फटका या चिमुरडीला बसल्याची चर्चा आहे. पहाटेच्या सुमारास आईला आपली मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत चिमुरडीची आई, प्रतीक्षा काटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. मुलगी लहान असल्याने त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी विभागाकडून मुदत मागून घेतली होती. मात्र, प्रशिक्षणाला जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्या पोटच्या गोळ्याला हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार उष्माघात हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी, शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळेल. राज्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी विशेषतः लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्यावी, दुपारच्या वेळी प्रवास टाळावा आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.