इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची मोठी बैठक पार पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खरगे असं म्हणाले आहेत.
या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा, द्रमुकचे टी.आर. बालू, आरजेडीकडून तेजस्वी यादव आणि संजय यादव, जेएमएमकडून चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सकडून फारूख अब्दुल्ला, सीपीआयकडून डी. राजा, सीपीआय(एम) कडून सीताराम येचुरी आणि शिवसेनेकडून अनिल देसाई (ठाकरेगट) उपस्थित होते.
या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, ''आज आमची इंडिया आघाडीची बैठक पार पडली. दीड तास आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. निवडणुका आणि मतमोजणीवेळी येणाऱ्या गोष्टींवर चर्चा केली. कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना दिल्या पाहिजे, त्यावरही चर्चा झाली.''
ते म्हणाले, ''आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. आज सर्वांनी एकत्र आम्ही चर्चा केली. भाजप आणि त्यांचे सहकारी आज एक्झिट पोलची चर्चा करतील. ते जो नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतील, त्याची खरी माहिती आम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे.''
खरगे म्हणाले, ''आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत आणि आमच्या सूचना त्यांच्या समोर ठेवणार आहोत. उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली आहे. बॅलेट पेपरची मतमोजणी आधी करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.