वेळेत मूल होणं योग्य असतं, असं महिलांना नेहमी म्हटलं जातं. वय वाढल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते. मात्र, पुरुषांच्या बाबतीत असं असतं का, याचा विचार कधी केला आहे का? नव्या संशोधनातून हे स्पष्ट झालंय की, पुरुषांची प्रजनन क्षमता देखील वय वाढल्याने प्रभावित होते.
थोडक्यात सांगायचं तर पुरुषही एका विशिष्ट वयापर्यंतच वडील बनू शकतात. जर पुरुषाचं वय ५० वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांच्या जोडीदाराच्या गर्भधारणेची शक्यता कमी होते आणि गर्भधारणेदरम्यान महिलेला गंभीर गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो.
अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात ४ कोटी ६० लाखांहून अधिक डेटाचा अभ्यास करण्यात आला. यात ३० वर्षांच्या वडिलांची तुलना ५० वर्षांच्या वडिलांशी करण्यात आली.
वेलिंग्टनच्या मोनाश विद्यापीठातील संशोधक करिन हैमरबर्ग यांच्या मते, आईच्या वयासह गर्भधारणेच्या परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या इतर घटकांचा विचार करता वडिलांच्या वयात दर दहा वर्षांनी वाढ झाल्यास गर्भधारणेतील गुंतागुंती वाढतात. संशोधनात असंही आढळलं की, वडिलांचं वय ५० वर्षांच्या आसपास असल्यास वडील बनण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
२०११ मध्ये पुरुषांचं सरासरी वय ३०.८ वर्ष होती, जे २०२२ मध्ये वाढून ३२.१ वर्ष झालं होतं. त्याच कालावधीत ५० वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांचं वडील बनण्याचं प्रमाण १.१% वरून १.३% पर्यंत वाढलं. ऑस्ट्रेलियातील अचूक प्रमाण माहित नसलं तरी, डेटानुसार वडिलांच्या सरासरी वयात वाढ झाली आहे.
१९७५ मध्ये ऑस्ट्रेलियातील वडिलांचे सरासरी वय २८.६ वर्ष होतं जे २०२२ मध्ये ३३.७ वर्षांपर्यंत पोहोचलं होतं.
संशोधकांच्या मते, जरी पुरुष तरुण वयापासून वृद्धापकाळापर्यंत शुक्राणू तयार करत असले, तरी ४० वर्षांनंतर शुक्राणूंची गुणवत्ता घटते. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते आणि गर्भधारणेसाठी अधिक वेळ लागतो.
एका अभ्यासातून असं समोर आलं की, ४५ वर्षांहून अधिक वयाच्या पुरुष जोडीदार असलेल्या महिलांना गर्भधारणेसाठी एक वर्षाहून अधिक वेळ लागण्याची शक्यता २५ वर्षांखालील पुरुष जोडीदार असलेल्या महिलांच्या तुलनेत पाच पट अधिक होती. २५ वर्षांखालील पुरुषांपैकी ७६.८% महिलांनी सहा महिन्यांत गर्भधारण केली, तर ४५ वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांपैकी फक्त ५२.९% महिलाच गर्भवती होऊ शकल्या.
दहा वेगवेगळ्या अभ्यासांमधून गोळा केलेल्या डेटानुसार, वृद्ध पुरुषांच्या जोडीदारांना गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. २५ ते २९ वर्षांच्या पुरुषांशी तुलना करता ४५ वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांमुळे पार्टनरच्या गर्भपाताचा धोका ४३% अधिक होता.
प्रजनन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जोडप्यांमध्ये असं आढळलं की, ४० वर्षांखालील पुरुष असलेल्या जोडप्यांमध्ये गर्भपाताचा धोका २५% कमी होता. त्याचप्रमाणे ४० वर्षांखालील पुरुष असल्यास उपचारानंतर बाळ जन्मण्याची शक्यता जवळपास दुप्पट होती. ४० वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांमध्ये ही शक्यता १७.६% होती. तर ४० वर्षांखालील पुरुषांमध्ये ती २८.४% होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.