Shreya Maskar
उद्या (8 मार्च ) महिला दिन आहे. तुमच्या आयुष्यातील लाडक्या महिलेला कामापासून सुट्टी द्या आणि तिच्यासाठी खास चटपटीत बेत बनवा. रेसिपी खूपच सोपी आहे.
कुळीथाची भाजी बनवण्यासाठी कुळीथ, कांदा, लसूण, सुके खोबरे, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, कढीपत्ता, मोहरी, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात शेंगदाणे देखील टाकू शकता.
कुळीथाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी भिजवलेले कुळीथ कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यानंतर मिक्सरला खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट बनवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून मस्त फोडणी द्या. यात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो चांगला खरपूस परतून घ्या. हे करताना गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
आता भाजीत तयार वाटण, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. यात आता शिजवलेले कुळीथ टाका.
भाजीला उकळी आल्यावर त्यात इतर सर्व मसाले, चवीनुसार मीठ टाकून १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. शेवटी भाजीवर कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घ्या.
झणझणीत कुळीथाची भाजीचा गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घ्या. तुमच्या लाडक्या बायकोला स्वतःच्या हाताने भरवा.
कुळीथ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कुळीथमुळे वजन कमी होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.