हार्ट अटॅकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतेय. मुळात आता हा आजार केवळ वयस्कर व्यक्तींनाच नाही तर तरुणांनाही याचा त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. काही प्रकरणांमध्ये लहान मुलांचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं आणि वेळीच उपचार मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे.
दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी हार्ट अटॅकमुळे २८.६ लाख लोकांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅक आल्यास रुग्णालयात जाण्यापूर्वी काय करावं याबाबत इंडिया टीव्हीच्या वेबसाईटला नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्निश सिंह भाटिया यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अचानक अडथळा निर्माण होणं. यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकतं. अशा वेळी लवकर उपचार मिळणं महत्त्वाचं असतं. हे उपचार जर वेळेवर मिळाले तर रूग्णाचा जीव वाचू शकतो.
हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं. छातीत जडपणा, जळजळ किंवा छाती घट्ट झाल्यासारखं वाटू शकतं. हा त्रास काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू शकतो किंवा कमी होऊन पुन्हा सुरू होऊ शकतो. वेदना डाव्या हातात, दोन्ही हातांत, खांद्यात, पाठीत, मानेत किंवा जबड्यातही जाणवू शकतात.
याशिवाय श्वास लागणं, थंड घाम येणं, मळमळ, उलटी, चक्कर येणं, खूप अशक्तपणा आणि अस्वस्थ वाटणं हीदेखील हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये काही वेळा छातीत दुखण्याऐवजी श्वास लागणं, अशक्तपणा, अपचन किंवा अचानक जास्त थकवा जाणवू शकतो.
हार्ट अटॅकचा संशय आल्यास वेळ वाया घालवू नका. रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून द्या.
रुग्णाला बसवा किंवा आरामदायी स्थितीत ठेवा. त्याला स्वतः गाडी चालवून रुग्णालयात जाण्यास सांगू नका.
रुग्ण शुद्धीत असेल आणि त्याला औषध गिळता येत असेल तर अॅस्पिरिनची अॅलर्जी नसल्यास रक्तस्राव होत नसल्यास आणि डॉक्टरांनी हे औषध घेण्यास मनाई केलेली नसल्यास १५० ते ३२५ मिलीग्रॅम अॅस्पिरिन चावून घेणं मदत करू शकतं.
छातीत दुखणं, घाम येणं किंवा श्वास लागणं यांसारखी लक्षणं दिसल्यास हा केवळ गॅसचा त्रास आहे, असं समजू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
रुग्ण बेशुद्ध झाला आणि सामान्यपणे श्वास घेत नसेल तर तातडीने आपत्कालीन मदत बोलवा आणि CPR देण्यास सुरुवात करा. उपलब्ध असल्यास AED या हृदयाला विजेचा धक्का देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाची मदत घ्या.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.