पावसाळ्याच्या सुरुवातीस, विशेषतः जून महिन्यात डासांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यामुळे डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण डेंग्यूचा संसर्ग आई आणि गर्भातील बाळ या दोघांच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळणं गरजेचं आहे.
जून महिन्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचतं. घरात ठेवलेल्या बादल्या, कुंड्या, कुलर तसंच बांधकामाच्या ठिकाणी साचलेलं स्वच्छ पाणी हे एडीस नावाच्या डासांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण तयार करते. अशा ठिकाणी डासांची संख्या वाढल्याने डेंग्यूचा प्रसार वेगाने होतो आणि या काळात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते.
खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिमा थमके यांनी सांगितलं की, गर्भवती महिलांमध्ये डेंग्यूची लक्षणं साधारणपणे इतर रुग्णांसारखीच दिसतात. यामध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी व सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या, सततचा थकवा तसंच त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणं दिसल्यास वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
गर्भावस्थेत डेंग्यूचा संसर्ग अधिक धोकादायक ठरू शकतो. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं. तसेच प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये रक्तस्रावाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि रक्ताभिसरण आणि शरीरातील अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याचा अप्रत्यक्ष परिणाम गर्भातील बाळाच्या वाढीवर आणि आरोग्यावरही होऊ शकतो.
डेंग्यूचा तीव्र संसर्ग झाल्यास शरीरावर मोठा ताण निर्माण होतो. त्यामुळे गर्भाशयाचं आकुंचन होऊन अकाली प्रसूती होण्याचा धोका वाढतो. प्लेटलेट्सची संख्या खूप कमी झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येऊ शकते.
गर्भवती महिलांनी ताप किंवा इतर लक्षणं दिसल्यास स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. काही वेदनाशामक औषधं डेंग्यूच्या परिस्थितीत रक्तस्रावाचा धोका वाढवू शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय करता येतात. घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्या आणि दरवाजांवर जाळ्या बसवाव्यात, डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित मच्छर प्रतिबंधक औषधांचा वापर करावा, शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत आणि संध्याकाळच्या वेळी विशेष काळजी घ्यावी. तसेच नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या करून घेणेही महत्त्वाचे आहे.
एक डास चावणे देखील गर्भवती महिलांसाठी गंभीर ठरू शकते. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून संरक्षणासाठी योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेवर घेतलेली काळजी आणि वैद्यकीय सल्ला यामुळे आई आणि बाळ दोघांचेही डेंग्यूपासून संरक्षण होऊ शकतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.