TeenagePsychology saam tv
लाईफस्टाईल

शिक्षकांचं ऐकत नाहीत, पालकांना उलट उत्तरं देतात; मुलांच्या वागण्यामागे काय आहे कारण?

Why Do Teenagers Ignore Their Parents And Teachers? : किशोरवयीन मुलं पालकांचं ऐकत नाहीत, शिक्षकांना उलट उत्तरं देतात किंवा आक्रमक वागतात? मुलांच्या बदलत्या वर्तनामागील मानसशास्त्रीय, सामाजिक आणि भावनिक कारणं जाणून घ्या.

Omkar Sonawane

आजकालची मुलं कोणाचे ऐकतच नाहीत, शिक्षकांचा आदर राहिलेला नाही!, मुलांमध्ये सहनशीलता आणि शिस्त कमी होत चालली आहे! अशी वाक्ये आजकाल अनेक पालक आणि शिक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. विशेषतः १५ ते १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलांमध्ये आक्रमकता, नियम मोडणे, मित्रांसमोर वर्चस्व गाजवणे, भांडणे किंवा वस्तूंची तोडफोड करणे अशा वर्तनांबद्दल चिंता व्यक्त केली जाते. मात्र या वर्तनाकडे केवळ शिस्तीचा अभाव किंवा संस्कारांची कमतरता म्हणून पाहणे योग्य ठरेल का? मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला, तर किशोरवयीन मुलांचे वर्तन हे त्यांच्या शरीरात, मेंदूमध्ये, भावनिक जगात आणि सामाजिक संबंधांमध्ये घडणाऱ्या अनेक बदलांचे प्रतिबिंब असू शकते.

स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या विकासात्मक सिद्धांतानुसार किशोरावस्था हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात मुलांच्या मनात ‘मी कोण आहे?’, ‘माझ्या विचारांना महत्त्व का दिले जात नाही?’, ‘मला माझे निर्णय स्वतः घेता येऊ नयेत का?’ असे अनेक प्रश्न निर्माण होतात. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत काही मुले पालकांना किंवा शिक्षकांना विरोध करू शकतात. नियम मोडणे, उलट उत्तरे देणे किंवा स्वतःचे म्हणणे लावून धरणे हे काही वेळा स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नाचे स्वरूप असू शकते. अर्थात, प्रत्येक विरोधी वर्तनामागे ओळखीचा संघर्ष असतोच असे नाही.

भावना तीव्र, पण निर्णयक्षमता विकसित होण्याच्या प्रक्रियेत

किशोरवयात मेंदूच्या विकासातही महत्त्वाचे बदल घडतात. भावना, प्रेरणा आणि बक्षीसाशी संबंधित मेंदूच्या प्रणालींच्या तुलनेत निर्णयक्षमता, नियोजन आणि आवेगांवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची परिपक्वता अधिक काळ सुरू राहते. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये मुलांकडून विचार न करता प्रतिक्रिया देणे, रागावर नियंत्रण ठेवण्यात अडचण येणे किंवा तात्पुरत्या आनंदाला अधिक महत्त्व देणे असे वर्तन दिसू शकते. या वयात भावनिक नियमन आणि योग्य निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.

मित्रांचा प्रभाव आणि सामाजिक स्वीकाराची गरज

किशोरवयात मित्रांचे स्थान अधिक महत्त्वाचे बनते. मित्रांच्या समूहात स्वीकारले जाणे, लोकप्रिय असणे आणि स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे या गोष्टी मुलांसाठी महत्त्वाच्या असतात. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार माणूस इतरांचे निरीक्षण करून आणि त्यांच्या वर्तनाला मिळणारा प्रतिसाद पाहून शिकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाने शिक्षकांची चेष्टा केली आणि मित्रांनी त्याला हसून प्रतिसाद दिला, तर त्या वर्तनाला प्रोत्साहन मिळू शकते. हळूहळू इतर मुलेही त्याचे अनुकरण करू शकतात. काही वेळा मुलांना स्वतःला चुकीचे वाटत असले तरी मित्रांच्या दबावामुळे ते चुकीच्या वर्तनात सहभागी होतात. त्यामुळे आक्रमकता किंवा नियमभंग यामागे केवळ वैयक्तिक स्वभाव नसून समूहाचा प्रभावही असू शकतो.

पुरुषत्वाच्या कल्पना आणि आक्रमकता

काही सामाजिक वातावरणांमध्ये मुलांनी रडू नये, भीती दाखवू नये, कोणापुढे झुकू नये किंवा स्वतःची ताकद सिद्ध करावी अशा अपेक्षा असतात. परिणामी, काही मुलांना दुःख, भीती, असुरक्षितता किंवा निराशा व्यक्त करणे अवघड वाटते. अशा भावना कधी कधी राग किंवा आक्रमकतेच्या स्वरूपात व्यक्त होऊ शकतात. म्हणूनच मुलांना भावनिक अभिव्यक्तीची मोकळीक देणे आणि ताकद म्हणजे आक्रमकता नसून आत्मनियंत्रण, सहानुभूती आणि जबाबदारी आहे हे शिकवणे आवश्यक आहे.

घर, शाळा आणि समाज यांचा परस्परसंबंध

मुलांच्या वर्तनावर केवळ त्यांचा वैयक्तिक स्वभाव परिणाम करत नाही. घरातील संवाद, पालकांचे वर्तन, शाळेतील वातावरण, मित्रांचा प्रभाव आणि डिजिटल माध्यमे यांचाही त्यावर परिणाम होतो. विकासात्मक मानसशास्त्रज्ञ ब्रॉनफेनब्रेनर यांच्या पर्यावरणीय विकास सिद्धांतानुसार मुलाचा विकास त्याच्या सभोवतालच्या विविध सामाजिक व्यवस्थांच्या परस्परसंवादातून घडतो.

कुटुंबातील सततचे वाद, अतिनियंत्रण, भावनिक संवादाचा अभाव, शाळेतील अपमानास्पद अनुभव किंवा सोशल मीडियावरील आक्रमक आशय हे काही मुलांच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक असू शकतात.

शिक्षेपेक्षा समजून घेणे महत्त्वाचे

याचा अर्थ मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करावे असा नाही. हिंसा, धमकावणे, छळ किंवा तोडफोड यांना स्पष्ट मर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र केवळ शिक्षा देण्याऐवजी त्या वर्तनामागील कारणे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा, शिक्षकांनी अपमानाऐवजी सकारात्मक शिस्तीचा अवलंब करावा आणि शाळांनी भावनिक साक्षरता, रागाचे व्यवस्थापन, सहानुभूती व आत्मनियंत्रण यांसाठी उपक्रम राबवावेत. वर्तन सातत्याने दिसत असेल आणि मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर मानसशास्त्रीय मूल्यमापन आणि समुपदेशनाची मदत घ्यावी.

शेवटी, प्रश्न आजची मुलं बिघडली आहेत का, हा नसून त्यांच्या बदलत्या मानसिक आणि सामाजिक गरजा आपण समजून घेत आहोत का, हा आहे.

किशोरवयीन मुलांना केवळ शिस्तीची नाही, तर समजून घेणाऱ्या व्यक्तींची, भावनिक आधाराची आणि योग्य दिशादर्शनाचीही गरज आहे. कारण प्रत्येक बंडखोरी ही मदतीची हाक असेलच असे नाही; पण प्रत्येक असामान्य वर्तनामागे काय घडत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच व्हायला हवा.

डॉ. कविता गडदे

क्लिनिकल साइको-ऑंकोलॉजिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamal Design Saree: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा, कमळ डिझाइन्सच्या या ७ सुंदर ट्रेंडी साड्या

Maharashtra News Live Update: मेळघाटात अदानी समुहाच्या हजारो फूट उंचीवर असलेल्या प्रोजेक्टमध्ये घुसले ठाकरें गटाचे कार्यकर्ते

राज्य सरकार आपोआप कोसळणार; AIADMK नेत्यानं सांगितलं कारण, मुख्यमंत्री विजय यांचं टेन्शन वाढलं

धावपटूचा पाण्यात बुडून मृत्यू; सरावानंतर पोहण्यासाठी गेला अन् काळाचा घाला, क्रीडाक्षेत्रात शोककळा

Blood Pressure : सकाळ की संध्याकाळ? ब्लड प्रेशर नेमका कधी वाढतो? शरीरातच लपलंय हे चक्र, माहिती असायला हवं

SCROLL FOR NEXT