Reasons For Lack of Sleep Saam Tv
लाईफस्टाईल

Lack of sleep effects: खरंच रात्री ८ तासांची झोप नितांत गरजेची आहे? ६ तासच झोपलं तर काय होतं? तज्ज्ञांनी सांगितले परिणाम

Health risks of sleeping less than 8 hours daily: दररोज आठ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीर आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, ताण आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण झोपेला फारसं महत्त्व देत नाहीत. कामाचा ताण, उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय किंवा बिझी शेड्युल यामुळे लोकांची झोप कमी होत चालली आहे. अनेकांना वाटतं की, रात्रीचे दोन तास कमी झोपलं तरी त्याचा शरीरावर काही खास परिणाम होत नाही. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीर आणि मन या दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील वरिष्ठ ईएनटी सर्जन आणि स्लीप डिसऑर्डर तज्ज्ञ डॉ. मुरारजी घाडगे यांनी झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात नेमके काय बदल होतात याबद्दल माहिती दिली.

डॉ. घाडगे यांनी सांगितलं की, आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकांना वाटतं की सहा तासांची झोप पुरेशी असते. मात्र विविध संशोधनांनुसार, नियमितपणे आठ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसू शकतो.

डॉक्टरांनी सांगितलं की, जर एखादी व्यक्ती दररोज केवळ सहा तास झोपत असेल तर शरीराला आवश्यक असलेली झोप आणि रॅपिड आय मूव्हमेंट झोप मिळत नाही. झोपेच्या या टप्प्यांमध्ये शरीर आतून फीट होणं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं या महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात. दीर्घकाळ झोप कमी राहिल्यास शरीरात स्लीप डेट म्हणजे झोपेची कमतरता होते.

डॉ. मुरारजी घाडगे यांच्या मते, कमी झोपेचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे व्यक्ती पाहिजे तेवढा जागरूक राहत नाही. आठ तासांऐवजी सहा तास झोपल्यास व्यक्तीची प्रतिक्रिया देण्याची क्षमता मंदावते, चिडचिड वाढते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.

अशा परिस्थितीत काम करताना लक्ष विचलित होणं, गोष्टी लक्षात न राहणं किंवा निर्णय घेण्यात गोंधळ होणं असे प्रकार दिसू शकतात. मेंदूवर होणारा हा हलका परिणाम काही प्रमाणात दारूचं सेवन केल्यावर जाणवणाऱ्या स्थितीसारखा असू शकतो.

जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो

झोपेची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. डॉ. घाडगे सांगतात की, सतत कमी झोप घेतल्यास लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. दरम्यान काही अभ्यासांमध्ये झोपेच्या कमतरतेचा कॅन्सरशी संबंध असल्याचं समोर आलं आहे.

रोगप्रतिकार शक्तीवर होतो परिणाम

कमी झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. त्यामुळे संसर्गजन्य आजार पटकन होण्याची शक्यता वाढते. मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. झोपेची कमतरता वाढल्यास चिंता, ताण आणि नैराश्य यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हार्मोन्सच्या संतुलनात बिघाड

झोप कमी झाल्यास शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावरही परिणाम होतो. डॉ. घाडगे यांच्या मते, झोपेच्या अभावामुळे घ्रेलिन नावाचं भूक वाढवणारं हार्मोन वाढतं. तर लेप्टिन हे पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे व्यक्तीला जास्त भूक लागते आणि अनावश्यक खाण्याची सवय वाढू शकते. परिणामी वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

दीर्घकालीन आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक

डॉ. घाडगे शेवटी सांगतात की, काही दिवस सहा तास झोप घेणं फार मोठी गोष्ट वाटत नाही. पण बराच काळ तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर शरीर आणि मेंदूसाठी हे धोकादायक ठरतं. त्यामुळे दररोज सुमारे आठ तासांची चांगली आणि सलग झोप घेणं गरजेचं आहे. योग्य झोप घेतल्यास केवळ थकवा कमी होत नाही तर आरोग्यही चांगलं राहतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Alia Bhatt Birthday : आधी स्टार किड म्हणून हिणवलं; आता आहे बॉलिवूडची क्वीन, एका भूमिकेने रातोरात चमकले नशीब

घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

Peacock eating snake: विषारी साप खाऊनही मोर कसा जिवंत राहतो?

SCROLL FOR NEXT