सातपुड्यांच्या पर्वतरांगामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत. आतापर्यंत या ठिकाणी अनेक प्रकारच्या दुर्मिळ, औषधी वनस्पती आढळून आल्या आहेत. त्यामुळे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, संशोधक आजही याठिकाणी औषधी वनस्पती शोधत असतात. नुकतंच या ठिकाणी अजून एक औषधी वनस्पतीचा शोध लावण्यात आला आहे. त्यांना सापडलेली ही वनस्पती लोप पावली जात असल्याचं दिसतंय.
तळोद्यातील प्राध्यापक डॉ. महेंद्र माळी दिवाळीच्या पर्वात दरवर्षीप्रमाणे सातपुड्यातील प्रसिद्ध अश्वस्थामा यात्रेसाठी गेले होते. मुळात डॉ. माळी वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना यामध्ये प्रचंड आवड आहे. ते नेहमीप्रमाणे ज्याठिकाणी जातात त्याठिकाणी दुर्मिळ, मानवांसाठी उपयोगी अश्या वनस्पतीचा शोध घेत असतात. अश्वस्थामा यात्रेदरम्यान त्यांना एक लोप पावत चालेली वनस्पती आढळून आली. सदर वनस्पतीचे औषधी गुणधर्म असून तिचा उपयोग विविध आजारांवर केला जातो.
जटा शंकर (डायोस्कोरिया अलाटा) असं या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे. आयुर्वेदानुसार मधुर रस, गुरु, स्निग्ध गुण आणि शीतशक्ति असलेली ही एक औषधी वनस्पती आहे. याची वेल एका सिझनमध्ये उत्पादन घेतल्यानंतर मरते आणि पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब पुन्हा वाढतो. या वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात.
डायॉस्कोरिया पार्सिमिलिस, डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते असून हिचे सुमारे 72 प्रकार ओळखले गेले आहेत. या वनस्पतीचं खोड चौकोनी, काहीसं सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. वनस्पतीची पानं साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. ही वनस्पती लोप पावत चाललेली आहे, त्यामुळे तिचे संवर्धन होणं आवश्यक आहे.
असं मानलं जातं या वनस्पतीमुळे शुक्राणूंची संख्या वाढते. त्याचप्रमाणे लघवी साफ होते, पोटातील जंत मरतात. मधुमेह, कुष्ठरोग, प्रमेह, लघवीचा जलोदर यांच्यावरही चांगली परिणाम दिसून येतो. कंद नीट शिजवून प्रमाणात खाल्ल्याने शरीर निरोगी, मजबूत होते.
आधुनिक औषधात काही प्रजातींपासून तयार केलेले 'स्टेरॉइड सॅपोजेनिन' हे गर्भनिरोधक गोळ्यांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. खोकला, सर्दी, पोटदुखी, कुष्ठरोग, जळजळ, बुरशीजन्य संसर्ग, आमांश, त्वचा रोग, संधिवात अश्या विविध आजारांवर उपचार म्हणून वेगवेगळ्या डायोस्कोरिया प्रजातींचं कंद अनेक फॉर्म्युलेशनमध्ये वापरले जातात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.