दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी आनंद द्विगुणीत करते, पण यामुळे हवेत पसरणारा धूर आणि विषारी घटक तुमच्या त्वचेचे छुपे शत्रू ठरतात. फटाक्यांमधून बाहेर पडणारे सल्फर, हेवी मेटल्स आणि बारीक धुलीकण हवेची गुणवत्ता तर खराब करतातच, शिवाय त्वचेचे छिद्र बंद करून ॲलर्जी, पिंपल्स, ड्रायनेस आणि अकाली वृद्धत्वाची समस्या निर्माण करतात. म्हणूनच, या सणासुदीच्या दिवसांत आनंदासोबतच फटाक्यांच्या प्रदूषणापासून त्वचेचे रक्षण कसे करावे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्वचेला हायड्रेशनची गरज नेहमीच असते, पण दिवाळीच्या काळात याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कामाच्या धावपळीत पाणी पिणे विसरू नका आणि आहारात ज्यूसचाही समावेश करा. तसेच, जास्त गोड किंवा पॅकबंद अन्न खाणे टाळा.
त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आहाराइतकेच स्किनकेयरमध्येही काही गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरते. यामध्ये हायलुरोनिक एसिड, सेरामाइड्स किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार योग्य मॉइश्चरायझरचा समावेश करा. या दिवसांत हवेतील ओलावा कमी झाल्याने त्वचा कोरडी पडू शकते. तसेच, दिवाळीपूर्वी कोणतेही केमिकल पील किंवा हार्डी एक्सफोलिएशन करणे टाळा.
सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे कारण सूर्यकिरणे आणि प्रदूषक घटक एकत्र येऊन त्वचेवर पिगमेंटेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवू शकतात. यापासून वाचण्यासाठी ३० किंवा त्याहून अधिक एसपीएफ (SPF) असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रदूषणातही त्वचेवर एक सुरक्षेचा थर राहील.
फटाके फोडताना धूर चेहऱ्याच्या संपर्कात कमीत कमी येईल याची काळजी घ्या. यासाठी स्कार्फ किंवा दुपट्ट्याने चेहरा झाकून ठेवू शकता. तसेच, घराबाहेर असताना मास्क घालणेही फायदेशीर ठरते.
हेवी फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर आणि कन्सीलरचा जाड थर प्रदूषणामध्ये त्वचेच्या समस्या वाढवू शकतो. भारी मेकअपमुळे प्रदूषक घटक त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकून बसतात. त्यामुळे जर तुम्हाला मेकअप करायचाच असेल, तर 'नॉन-कॉमेडोजेनिक' उत्पादनांचा वापर करणे हा एक चांगला पर्याय ठरेल.
टीप
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा