भारतात सध्या चिकनपॉक्स (कांजण्या) रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. विशेषतः ऋतू बदलाच्या काळात तसेच शाळा, महाविद्यालये, कार्यालये किंवा सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या संपर्कामुळे संसर्ग झपाट्याने पसरत आहे. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्याने एका संक्रमित व्यक्तीकडून कुटुंब, वर्गखोली किंवा कार्यस्थळी अनेकांना सहज संसर्ग होऊ शकतो.
चिकनपॉक्स हा व्हेरिसेला-झोस्टर व्हायरस (VZV) मुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या अंगावर येणाऱ्या पाण्याने भरलेल्या फोडांमधून, पुरळीतून तसेच खोकला किंवा शिंकांद्वारे हा संसर्ग पसरू शकतो. विशेष म्हणजे, अंगावर पुरळ येण्यापूर्वीही संक्रमित व्यक्तीकडून हा विषाणू इतरांना पसरू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी संसर्ग रोखणे अधिक कठीण ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चिकनपॉक्सचा सर्वाधिक परिणाम अजूनही लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. मात्र, अलीकडे किशोरवयीन आणि प्रौढांमध्येही या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगतात. प्रौढांमध्ये हा आजार तुलनेने अधिक गंभीर ठरू शकतो. त्यामध्ये जास्त ताप, तीव्र वेदना, अशक्तपणा आणि बरे होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
काही विशिष्ट गटांना चिकनपॉक्समुळे गुंतागुंत होण्याचा अधिक धोका असतो. यात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, यापूर्वी कधीही चिकनपॉक्स न झालेली प्रौढ व्यक्ती, तसेच कर्करोगग्रस्त, मधुमेह असलेले रुग्ण, दीर्घकाळ स्टेरॉईड्स घेणारे, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण आणि लसीकरण न झालेली लहान मुले यांचा समावेश होतो.
व्हेरिसेला (चिकनपॉक्स) लसीकरणाबाबत जागरूकतेचा अभाव आणि लसीकरणात होणारा विलंब हेही रुग्णसंख्या वाढण्यामागील महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. अनेकदा सुरुवातीची लक्षणे सामान्य व्हायरल ताप समजून दुर्लक्षित केली जातात, त्यामुळे संक्रमित व्यक्तीकडून नकळत इतरांमध्ये संसर्ग पसरतो.
चिकनपॉक्सची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी आणि अंगावर खाज येणारे लाल पुरळ, जे पुढे पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये बदलतात. पुरळ येण्याच्या १ ते २ दिवस आधीपासून ते फोड सुकून जाण्यापर्यंत रुग्ण इतरांना संसर्ग पसरवू शकतो.
योग्य काळजी, पुरेशी विश्रांती, भरपूर पाणी पिणे आणि स्वच्छता राखल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, असे डॉक्टर सांगतात. मात्र, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप दीर्घकाळ कायम राहणे, गोंधळल्यासारखे वाटणे, शरीर खूप गरम होणे, शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) जाणवणे किंवा त्वचेवर गंभीर संसर्ग दिसणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशा वेळी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, संक्रमित व्यक्तींना इतरांपासून वेगळे ठेवणे, नियमित हात धुणे, फोड खाजवणे टाळणे आणि वेळेवर लसीकरण करणे या साध्या पण प्रभावी उपाययोजनांमुळे चिकनपॉक्सचा प्रसार रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. डॉ. मुर्तजा एस. बागवाला, Head of Emergency Medical Services, Saifee Hospital यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.