प्रोटीन म्हटलं की अनेकांच्या ताटात अंडी ही येतातच. अंडी हा प्रोटीन मिळवण्याचा स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय आहे. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष देणारे अनेक जण त्यांच्या दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात. एका अंड्यात साधारण ६ ग्रॅम प्रोटीन मिळतात. त्यामुळे काही जण दिवसातून दोन अंडी खातात, तर काही जण शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळावेत म्हणून रोज चार अंडी खाऊ लागतात.
मात्र, रोज चार अंडी खाणं शरीरासाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात येऊ लागतो. अंडी खाल्ल्याने प्रोटीनची गरज पूर्ण होते, मात्र त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते का याची शंका येत. या प्रश्नांची उत्तरं फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. सुनील जिंदाल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली आहेत. याबाबात डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात.
शरीराला पुरेशी प्रोटीन मिळावं म्हणून अनेकजण ४ अंडी खातात. प्रोटीन मिळावं म्हणून अनेक जण रोज चार अंडी खातात. मात्र डॉ. सुनील जिंदाल यांच्या मते, रोज चार अंडी खाणं प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती अंडी खावीत हे तिच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी, दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या कॅलरी आणि एकूण आहारावर अवलंबून असतं.
ज्या लोकांच्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचं (LDL) प्रमाण वाढलेलं आहे, तसंच ज्यांना मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी अंडी किती खावीत हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावं. कारण प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते.
अंड्यातील पिवळ्या भागामुळे म्हणजेच अंड्याच्या बलकामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, असं अनेकांना वाटतं. डॉ. सुनील यांच्या मते, अंड्याचा बलक खाण्याची भीती बाळगण्यापेक्षा त्यातील पोषक घटक समजून घेणं महत्त्वाचं आहे. अंड्याच्या बलकामध्ये कोलीन, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन ए आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे घटक आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात.
त्याचप्रमाणे तुम्ही अन्नातून घेत असलेलं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आहारातून मिळणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर सारखाच परिणाम होत नाही. हा परिणाम व्यक्तीच्या एकूण आहारावर आणि रक्तातील एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर अवलंबून असतो. त्यामुळे अंडी खाल्ल्याने प्रत्येकाचं कोलेस्ट्रॉल वाढेलच असं म्हणता येत नाही.
अंड्यांमध्ये चांगल्या दर्जाचं प्रोटीन असून ते स्नायू तयार होण्यासाठी आणि स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी मदत करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अंड्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली नऊ अमिनो आम्लं असतात. याशिवाय व्हिटॅमिन बी१२, सेलेनियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वंही मिळतात. अंड्याच्या बलकामध्ये कोलीन नावाचा पोषक घटक असतो. शरीरातील पेशी व्यवस्थित काम करण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी कोलीन महत्त्वाचं असतं. त्यामुळे अंडी हा केवळ प्रोटीन मिळवण्याचा पर्याय नसून त्यातून शरीराला इतरही महत्त्वाचे पोषक घटक मिळतात.
अंड्यांमधून शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. मात्र केवळ अंडी खाऊन शरीराच्या पोषणाची गरज पूर्ण होत नाही. दिवसभरात आपण काय खातो याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, असं डॉ. सुनील जिंदाल सांगतात.
शरीराला पुरेसं प्रोटीन आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळण्यासाठी आहारात डाळी, बीन्स, हिरव्या पालेभाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला प्रोटीनसोबत जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटकही मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करताना आपल्या आरोग्याचा आणि एकूण आहाराचा विचार करणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.