गर्दीत पॅनिक अटॅकची लक्षणे वेळीच ओळखणं आवश्यक आहे.
हृदयाचे ठोके वाढणं, श्वास घेताना त्रास, चक्कर ही मुख्य लक्षणे आहेत.
ही लक्षणे तात्पुरती असतात आणि जीवघेणी नसतात.
शांत राहणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या माहितीनुसार, पॅनिक अटॅक म्हणजे अचानक येणारा झटका किंवा भीतीची भावना होय. जेव्हा प्रत्यक्षात कुठलाही धोका नसतो. या वेळी शरीर आणि मन अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात की जणू काही गंभीर संकट येणार आहे. पॅनिक अटॅकच्या वेळेस हृदय जोरात धडकू लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, अशक्तपणा जाणवणं आणि रुग्णाला असं वाटतं की तो बेशुद्ध पडेल किंवा मृत्यू जवळ आला आहे.
तज्ज्ञांनी सांगितलं की, पॅनिक अटॅक ही रुग्णांसाठी अत्यंत त्रासदायक अवस्था असते. ही लक्षणं वेळेवर ओळखणं महत्त्वाचं असतं, विशेषत: जेव्हा ही परिस्थिती गर्दीत घडते. कारण गर्दीत असताना रुग्णाला वाटतं की लोक त्याला मस्करीत घेतील. मात्र ही लक्षणं हार्ट अटॅक असू शकतात. कारण रुग्णाच्या छातीत वेदना असल्याचं सांगतो किंवा हृदयाचे ठोके वाढल्याचं दिसतं. मात्र लक्षात ठेवा, पॅनिक अटॅक भीतीदायक असला तरी ते जीवघेणा नसतो.
या अवस्थेत व्यक्ती अचानक अस्वस्थ होतो, घामाने भिजतो, चक्कर येते, हात थरथरतात किंवा श्वास घेताना छातीत जडपण जाणवतं. काहीवेळा तो बोलणं थांबवतो, नजर चुकवतो किंवा स्वतःपासून तुटल्यासारखं वाटू शकतं. गर्दीत अशी स्थिती निर्माण झाल्यास आसपासचे लोक घाबरून गोंधळ करतात. पण तज्ज्ञांच्या मते शांत राहणं, रुग्णाला आधार देणं आणि त्याला हळूवार श्वास घ्यायला सांगणं हीच योग्य पद्धत आहे.
जर तुम्हालाच पॅनिक अटॅक आला असेल, तर लक्षात ठेवा की ही लक्षणं तात्पुरती असतात आणि थोड्याच वेळात कमी होतात. जमिनीवर पायांचा स्पर्श जाणवून घेणं किंवा आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या साध्या ग्राउंडिंग एक्सरसाईझही मदत करू शकतात. अचानक श्वास घ्यायला त्रास होणं, हृदयाचे ठोके वेगाने वाढणं, चक्कर येणं किंवा गर्दीतून बाहेर पडण्याची इच्छा होणं ही पॅनिक अटॅकची मुख्य लक्षणं आहेत. या वेळी घाबरून न जाता शांत राहणं आणि सुरक्षित जागा शोधणं आवश्यक आहे.